अधिकाऱ्याची बदली केली मात्र आजही जिल्हाभरात वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरणे सुरुच.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/१२/२०२४
जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात खाजगी एका वाहनांमध्ये गॅस भरत असतांनाच टाकीचा स्फोट होऊन सात निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना घडल्यानंतर जळगाव शहरासह संपूर्ण जिल्हाभरात याचे पडसाद उमटले होते. याची दखल घेत आचारसंहिता संपताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम यांना जबाबदार धरुन त्यांची मुख्यालयातील नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली केली आहे.
यामागील मुख्य कारण म्हणजे मागील महिन्यात एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इच्छादेवी चौकात एका ठिकाणी खाजगी वाहनात गॅस भरतांना टाकीचा स्फोट होऊन या स्फोटत ११ जण भाजले गेले होते. यापैकी सात जणांना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ही घटना घडल्यानंतर या घटनेबाबत संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून तीव्र पडसाद उमटले होते. याची दखल घेऊन एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनला सहा महिन्यांपूर्वी हजर झालेले पोलीस निरीक्षक यांची आचारसंहिता संपताच ०७ डिसेंबर २०२४ शनिवार रोजी बदलीचे आदेश काढून त्यांची मुख्यालयातील नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली केली आहे.
***************************************************
पकडा गया वो चोर हैं, बाकी सब शिर जोर हैं !
***************************************************
जळगाव एम. आय. डी. सी. येथील इच्छादेवी चौकात स्फोटाची घटना घडल्यानंतर पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली असली तरी मात्र फक्त अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन बदली करणे योग्य असले तरी वाहनांमध्ये अवैधपणे गॅस भरण्याचा हा गोरखधंदा कोणाच्या ताकदीवर चालतो ? यांना इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर पुरवठा कुठून केला जातो ? जळगाव शहरासह जिल्ह्याभरात गॅसवर चालणारी वाहनांमध्ये मान्यताप्राप्त गॅस किट बसवले आहे का ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तसेच काही विपरीत घटना घडल्यानंतर शासन, प्रशासन खडबडून जागे होते व कारवाई केल्याचा डांगोरा पिटला जातो मग हे अवैध धंदे दिवसाढवळ्या, रात्रंदिवस, बिनबोभाटपणे भररस्त्यावर सुरु असतात तेव्हा ते दिसत नाहीत का ? किंवा दिसत असतील तर ते चिरीमिरी घेऊन त्याकडे दुर्लक्ष केले जाते का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कारण आजही जळगाव शहरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील मोठमोठ्या शहरात व खेड्यापाड्यातील गल्लीबोळात भरवस्तीत ठिकठिकाणी अवैधपणे वाहनांमध्ये गॅस भरण्याचा गोरखधंदा सुरु आहे. मात्र या ठिकाणी कारवाई का केली जात नाही ? कारवाई केली जात नसेल तर मग कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले अधिकारी व कर्मचारी अजून एखादा मोठ्या अपघाताची वाट तर पहात नाहीत ना ? असा खडा सवाल उपस्थित केला जात असून अवैध गॅस सिलिंडर विक्री करणाऱ्या गॅस कंपन्यांची चौकशी करुन पुरवठा विभागामार्फत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.