काकणबर्डी येथे आज खंडोबा महाराज यात्रोत्सव.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/१२/२०२४
हिवाळ्यात मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागताच पाचोरा ते गिरड रस्त्यावर शहरापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या काकणबर्डी टेकडीवर जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेकडो वर्षांपासून परंपरा असलेला जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा देवाची यात्रा भरते व येथूनच यात्रोत्सवाला सुरवात होऊन पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा, सावखेडा व अनेक गावांमध्ये मोठ्या उत्साहात यात्रोत्सव सुरु होतात.
पौराणिक कथेनुसार अशी आख्यायिका आहे की पाचोरा शहरापासून उत्तरेला असलेल्या टेकडीवर भगवान महादेवाच्या अनेक अवतारापैकी असलेल्या खंडोबा अवताराचे मंदिर आहे. याठिकाणी खंडोबांनी त्यांचा दुसरा विवाह झाल्यानंतर दुसऱ्या विवाहिचे हाताचे काकण या स्थळी सोडले होते. तेव्हापासून या टेकडीला काकणबर्डी असे नाव पडल्याची कथा प्रचलित झाली असून काकणबर्डी देवस्थान हे महाराष्ट्र राज्यातील मल्हार भक्तांचे एकमेव देवस्थान असल्याचे बोलले जाते.
याच ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठीला येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेनिमित्त भाविकांकडून या मंदिराला रंगरंगोटी करुन विद्यूत रोषणाई करत संपूर्ण मंदिर फुलांचा माळांनी सजवले जाते. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेरायाच्या मुर्तीचे पुजन करुन हळद , खोबऱ्याचा प्रसाद उधळत बाजरीची भाकरी व वांग्याच्या भरीताचा नैवेद्य दाखवून यळकोट, यळकोट जय मल्हार या गजरात खंडेरायाचा जयजयकार केला जातो.
काकणबर्डी हे इतिहासकालीन पुरातन काळापासूनचे छोटेसे मंदिर होते. या छोट्याशा मंदिराचा भाविकांनी लोकसहभागातून तीन वेळा जिर्णोध्दार केला मंदिराचा जिर्णोद्धार झाल्यावर सुध्दा भाविक, भक्तांकडून आर्थिक योगदान मिळतच होते या मिळालेल्या योगदानातून याठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी सभागृह असलेले मंदिर उभारण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेमार्फत मिळणाऱ्या धार्मिक स्थळांच्या विकास निधीतून टेकडीवर चढण्यासाठी पायऱ्या, पिण्याच्या पाण्याची टाकी व भाविक भक्तांसाठी निवासाची व्यवस्था केली आहे.
या काकणबर्डी येथील खंडेरायाच्या दर्शनासाठी यात्रेनिमित्त तसेच प्रत्येक रविवारी भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात ही भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन या देवस्थानचा सर्वांगीण विकास करण्याची गरज असल्याचे लक्षात घेऊन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी या परिसराच्या विकासासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे याठिकाणी विविध विकासकामे सुरु आहेत.
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेत सर्व समाजबांधव स्री, पुरुष, बालगोपाल सामिल होत असल्याने या यात्रेत उपहारगृह, हॉटेल, रसवंती, खेळणी, रहाट पाळणे, करमणुकीची साधने याची दुकाने लागलेली असतात. या यात्रेत विशेष करुन शेव, मुरमुरे, चहा, गुळाची जिलेबी, रेवडी हे खाद्यपदार्थ आवडीने घेतले जातात तसेच फुल, हार, खोबरे, हळद, नारळ, गंध, टीका हे पुजेसाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात विक्री केले जाते.
तसेच या यात्रेनिमित्ताने जेष्ठ पत्रकार व कुंचल्यातून रंग भरणारे लक्ष्मण सुर्यवंशी यांनी मंदिराची केलेलेली रंगरंगोटी व रेखाटलेली विविध चित्रे तसेच भाविकांच्या श्रमातून करण्यात आलेली वृक्षलागवड व संवर्धन हे सगळ्यांनाच मोहीत केल्याशिवाय राहत नाही.