लाडकी बहिण योजना नको पण संपूर्ण अवैध धंदे व दारुबंदी करा, लाडक्या बहिणींची एकमुखी मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/१२/२०२४
महायुती सरकारने निवडणूकीच्या तोंडावर माता भगिनींसाठी लाकडी बहिण योजना अमलात आणली असून या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा दिड हजार रुपये देण्यात आले व आता या रकमेत अजून वाढ करुन दरमहा एकविसशे रुपये देण्याबाबतचा संकेत मिळत आहे. असे असले तरी हे मिळणारे पैसे काही लाडक्या बहिणींना डोकेदुखी ठरत असल्याचे मत या त्रस्त लाडक्या बहिणींनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना भेटून व्यक्त केले आहे. कारण हे महिलांना लाडकी बहिण योजनेअंतर्गत मिळणारे पैसे घरातील व्यसनाधीन लोक महिलांना मारझोड करुन हिसकावून घेत आहेत. कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे पतीराज किंवा कुटुंबप्रमुख हे कोणत्या ना कोणत्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत.
यामुळे त्यांना व्यसनपूर्तीसाठी दररोज पैशांची गरज भासते व गरजेपोटी हे व्यसनाधीन लोक घरातील संसारोपयोगी वस्तू, घरातील धान्य तसेच महिलांच्या अंगावरील दागदागिनेच नव्हे तर सौभाग्याच लेन असलेले गळ्यातील मंगळसूत्र विकून आपली व्यसनपूर्ती करत आहेत. हा प्रकार येथेच थांबत नाही तर आता नुकत्याच मिळत असलेल्या (लाडकी बहिण) योजनेअंतर्गत मिळणारे पैसे हिसकावून घेण्यासाठी महिलांना मारझोड करणे, कधी उधार, उसनवार तर कधी घर किंवा शेती गहाण ठेवून खाजगी सावकाराकडून कर्ज काढत असल्याने यातूनच घराघरात भांडणतंटे होऊन महिलांना मारझोड करणे, पैशांसाठी सासुरवाशीण महिलांचा छळ करणे अशा घटना घडत आहेत. यातुनच घराघरात भांडणतंटे होऊन अनेक घरे उद्ध्वस्त होऊन नवऱ्याच्या व्यसनाधीनतेला वैतागून घटस्फोट घेणे, आत्महत्या करणे, रागाच्या भरात घर सोडून निघून जाणे अशा घटना दररोजच्या घडत आहेत.
कारण शासनाने एकाबाजूला लाडकी बहिण योजना अमलात आणली असून दुसरीकडे मोठमोठ्या शहरांसह लहानमोठ्या खेडेगावात तसेच रहदारीच्या मुख्य रस्त्यावर वाईन शॉप, बिअर बार व देशी दारुची दुकाने उघडण्याचा सपाटा लावला असून मागेल त्याला मागेल त्या शहरात, खेडेगावात किंवा हमरस्त्यावर वाईन शॉप, बिअर बार, देशी दारुची विक्री करण्यासाठी मुक्त परवाने दिले जात आहेत. तसेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात गावठी दारुची निर्मीती व विक्री सोबतच नकली दारु व ताडीची विक्री केली जात आहे यामुळे एकप्रकारे सगळीकडे दारुचा महापुर आला असल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे जिवनावश्यक वस्तू घेण्यासाठी सगळीकडे नियम व कायदे आहेत यात गोरगरीबांना दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळवून घेण्यासाठी रेशनकार्ड असणे अत्यंत गरजेचे तसेच शालेय शिक्षण व शासनाच्या इतर सवलती मिळवून घेण्यासाठी आपली ओळख पटवून देण्यासाठी कडक कायदे व नियमावली तयार केली गेली आहे. तसेच वाहन चालविणे, बॅंकेच्या व्यवहारासाठी ओळखपत्र सक्तीचे केले आहे. मात्र दुसरीकडे कोणत्याही दारुच्या दुकानातून दारु घेतांना कोणत्या अटी शर्ती लागू न करता वयाची अट न लावताच दिवसाढवळ्या, रात्रंदिवस पाहिजे तेथे दारु विक्री केली जात आहे.
यामुळे दररोज कित्येक संसार उद्धवस्त होत असून शहरातील मुख्य चौकात, मुख्य रस्त्यावर, गावागावात गल्लीबोळात बिनबोभाटपणे मुबलक प्रमाणात दारु विक्री केली जात असल्याने दररोज अपघातांची संख्या वाढत चालली असून अल्पवयीन मुलेही व्यसनाच्या आहारी जाऊ लागली आहेत. यात लाडक्या बहिणींनीच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्ती, पती, मुलगा, भाऊ, काका, बाबा, दिर व अल्पवयीन मुलांसह कित्येकांच्या आयुष्याची राखरांगोळी होत असल्याने आम्हाला लाडकी बहिण योजना नको परंतु सरसकट सर्व अवैध धंदे व दारुची दुकाने कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी लाडक्या बहिणींनी केली आहे.