अवैध लाकुड साठ्याचा पंचनामा सुरु असतांनाच तक्रारकर्त्यावर वखार मालकाच्या कुटुंबियांकडून जिवघेणा हल्ला.
![](https://satyajeetnews.com/wp-content/uploads/2024/12/Picsart_24-12-05_09-27-07-676-660x400.jpg)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/१२/२०२४
सद्यस्थितीत सगळीकडे राष्ट्रीय संपत्तीची लुट व अवैध धंदे सुरु आहेत याबाबत कुणीही तक्रार करायला तयार होत नाही यामागील कारण म्हणजे जो तक्रारदार असतो त्यालाच संबंधित भ्रष्ट अधिकारी व संबंधित अवैध धंदे करणारे व राष्ट्रीय संपत्तीची लुट करणारे एकत्रित येऊन आरोपी करुन आपल्या पापावर पांघरुण घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
याबाबत सविस्तर बोलायचे झाले तर पाचोरा व जामनेर तालुक्यात शासनाच्या कोणत्याही परवानग्या न घेता मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन करुन ते वाहतूक करुन विक्री करत लाखो रुपये कमावणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत यामुळे एकाबाजूला शासनाचा महसूल बुडत असून दुसरीकडे शासनाचे व सार्वजनिक भुखंड नष्ट होत असून यात गायरान जमीन, गावठाण जमीन, राखीव जंगलातील भू क्षेत्रावर हे गौण खनिज माफीया डल्ला मारत आहेत. हा तमाशा दिवसाढवळ्या, रात्रंदिवस बिनबोभाटपणे सुरु असल्यावर ही महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत.
तसेच एका बाजूला शासनातर्फे आहे ती निसर्ग संपत्ती जोपासण्यासाठी व नवीन वृक्षलागवड करुन निसर्ग संपत्तीमध्ये भर टाकण्यासाठी दरवर्षी लाखो नव्हे तर करोडो रुपये खर्च करुन वृक्षसंवर्धन, वृक्षलागवड, वृक्ष संगोपनासाठी खर्च करत असतांनाच दुसरीकडे मात्र राखीव जंगलातील तसेच सार्वजनिक क्षेत्रातील व काही इतर ठिकाणी असलेल्या निसर्ग संपत्तीची लुट सुरु असून यात मोठ्या प्रमाणात हिरव्यागार वृक्षांची दिवसाढवळ्या खुलेआम विनापरवानगी कत्तल केली जात असून यामुळे दिवसेंदिवस झपाट्याने निसर्ग संपत्तीचा ऱ्हास होत असून वर्षानुवर्षांपासून कमी होत असलेल्या पावसाचे प्रमाण व महत्त्वाचे म्हणजे वातावरणातील झपाट्याने कमी होणारा ओझोन वायूचा स्थर ही चिंतेची बाब आहे.
तरीसुद्धा आजही पाचोरा व जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरु असून या अवैध वृक्षतोडीकडे वनविभागाकडून व महसूल विभागाकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप निसर्गप्रेमींनी केला असून वनविभागाकडून कोणतीही परवानगी न घेता दररोज शेकडो लिंब, पिंपळगाव, आंबा, खैर व इतर हिरव्यागार वृक्षांची दिवसाढवळ्या, रात्रंदिवस, बिनबोभाटपणे, कत्तल केली जात आहे.
या निसर्ग संपत्तीचा होणारा ऱ्हास पाहून काल दिनांक ०४ डिसेंबर २०२४ बुधवार रोजी भोजे येथील एका सुज्ञ नागरिकांकडून अवैध वृक्षतोड थांबण्यासाठी व या अवैध वृक्षतोडीचे लाकुड चोरट्या मार्गाने विकत घेणाऱ्या भोजे येथील लाकुड वखारीची चौकशी केली जावी म्हणून वनविभागाकडे रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी भोजे येथील लाकुड वखारीला भेट देऊन तक्रारदाराच्या तक्रारी प्रमाणे चौकशी सुरु केली होती.
वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी येऊन तक्रारदाराच्या समोर चौकशी करत असल्याचे पाहून वखार मालकाच्या पायाखालची वाळू सरकली व त्यांनी संबंधित तक्रारदाराला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तक्ररदार त्यांच्या भुमिकेवर ठाम राहिल्याने आता जर काटेकोरपणे चौकशी झाली तर भांडाफोड होऊन माझे आर्थिक नुकसान होईल या भितीने लाकुड वखार मालकाने एक शक्कल लढवून त्याच्या कुटुंबातील महिलांना बोलावून वनविभागाचे अधिकारी व भोजे गावचे प्रथम नागरिक तसेच पोलीस पाटील यांच्यासमोर तक्रारदाराला मारठोक केली तसेच वनविभागाच्या एका अधिकाऱ्याच्या हातातील कागदपत्रे फाडून फेकल्याची घटना घडली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
हा सगळा प्रकार घडल्यानंतर वास्तविक पाहता सरकारी कामात अडथळा आणला म्हणून वनविभागाकडून रितसर तक्रार दाखल करणे क्रमप्राप्त होते मात्र लाकुड वखार मालक व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सलोख्याचे संबंध असल्याकारणाने वनविभागाकडून तक्रार दाखल न झाल्याने स्वता तक्रारदाराने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला जाऊन रितसर तक्रार दाखल केली आहे. मात्र येथेही संबंधित महिलांनी तक्रारदाराला वेठीस धरण्यासाठी काल रात्री उशिरा तक्रार दाखल केली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून हा प्रकार म्हणजे लाकुड वखारीवर सुरु असलेला गोरखधंदा उघडकीस येऊ नये म्हणून रचलेले कटकारस्थान असल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले असून या लाकुड वखारीची व झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.