खडकदेवळा खुर्द येथे विषबाधा होऊन सहा म्हशी व एक रेड्याचा मृत्यू, शेतकऱ्याचे अंदाजे सात लाख रुपयांचे नुकसान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/१२/२०२४
पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे विष बाधेमुळे ६ म्हशी व १ रेडा मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेत गरीब शेतकऱ्याचे सुमारे ७ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पशू वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून मृत्युमुखी पडलेल्या गुरांचे जागेवरच शवविच्छेदन केले. दरम्यान, खडकदेवळा खुर्द येथील रहिवासी राजू हरचंद परदेशी यांच्या मालकीच्या ६ म्हशी व रेडा यांना ३ डिसेंबर रोजी हे त्यांच्या घराजवळ असलेल्या २०० लिटर प्लास्टिकच्या बॅलर मधुन पाणी पाजले. हे पाणी प्यायल्यानंतर ६ म्हशी व एक रेडा यांचा थरकाप होवून ते सर्व जमिनीवर कोसळले.
हा प्रकार पाहून राजू परदेशी यांना काहिच कळेनासे झाले. दरम्यान, सुदाम वाघ, पोलिस पाटील तुकाराम तेली, बापू पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तत्काळ पशुधन विस्तार अधिकाऱ्यांना घटनेबाबत माहिती दिली. यानंतर पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सुजाता सावंत, डॉ. पंचलिंगे (बाबंरुड राणीचे), डॉ. दौंड (पिंपळगाव हरेश्वर), डॉ. बाविस्कर (पिंपळगाव हरेश्वर), डॉ. बोरसे (वरखेडी), डॉ. गिरिश माळी (गाळण), डॉ. शंकर मडावी (सातगाव डोंगरी), डॉ. हेमंत नागणे (लोहटार) यांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मयत झालेल्या म्हशी व रेड्याची पाहणी केली. या घटनेत ६ म्हशी तर एका रेड्याचा जागेवरच मृत्यू झाला असल्याने पशुधन विस्तार अधिकारी व सोबतच्या डॉक्टरांच्या पथकाने मयत झालेल्या गुरांचे जागेवर शवविच्छेदन केले व नमुने तपासणीसाठी पाठवणार असल्याचे पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सुजाता सावंत यांनी सांगितले.
असे असले तरी मात्र पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील शेतकरी राजू हरचंद परदेशी यांच्या मालकीच्या सहा म्हशी व एक रेड्याला विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. परंतु या म्हशी कुठेही चरण्यासाठी नेलेल्या नसतांनाही सुट्यांवर बांधलेल्या असतांनाही विषबाधा कशी काय झाली याबाबत तपास होणे गरजेचे आहे. कारण राजू हरचंद परदेशी यांचे आजच्या परिस्थितीत अंदाजे सात लाख रुपयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे या म्हशींना विषबाधा झाली आहे का ? विषबाधा झाली असेल तर कशामुळे झाली ? हे शोधणे महत्त्वाचे आहे. कारण म्हशी जागेवरच बांधलेल्या होत्या तसेच त्या म्हशींना जागेवरच वैरण, पाणी केले जात होते. व अशातच म्हशींना टाकीतून पाणी पाजताच काही वेळातच हा प्रकार घडला असल्याने व एकाचवेळी सगळ्या म्हशींना विषबाधा होणे शंका उपस्थित करण्यासारखा प्रकार असून एखाद्या अज्ञात आजाराची लागण तर झाली नसेल ना अशा शंकेने खडकदेवळा खुर्द व पंचक्रोशीतील गावातील पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
म्हणून सुज्ञ नागरिकांच्या मते म्हशींना टाकीतून पाजण्यात आलेले पाणी, इतर खाद्य व शवविच्छेदन करुन पाठवण्यात आलेला व्हिसेरा याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी पंचक्रोशीतील पशुधन पालकांनी केली आहे.