राजकारण असंतुष्ट आत्मांचा सागर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात भूकंप.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१२/२०२४
राजकारण हे क्षेत्र असंतुष्ट आत्मांचा सागर आहे. इथे कुणीही समाधानी नाही कारण प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा मोठ्या झाल्या आहेत. त्यामुळे जीवनातील आनंद हरवला आहे. राजकारण असो की कार्पोरेट जग असो इथे प्रत्येक जण असंतुष्ट असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात केले पुढे बोलतांना म्हणाले की राजकारणात प्रत्येकजण दुःखी आहे कारण प्रत्येकजण साध्य असलेल्या ज्या पदावर आहेत त्यापेक्षा मोठे पद त्यांना हवे आहे.
************************************************
नितीन गडकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात भूकंप.
************************************************
राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर आहे, असे नितीन गडकरी म्हणाले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडी आणि नितीन गडकरी यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून भूकंप झाला आहे. नगरसेवकाला, आमदारकीची आशा, तर आमदाराला मंत्रिपदाची अपेक्षा, मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षश्रेष्ठी कधी बाजूला करतील, याची भीती, राजकारणातल्या अतिमहत्त्वकाक्षांवर बोट ठेवून असंतुष्ट आत्म्यांना गडकरी यांनी चिमटे काढले. आव्हानांना सामोरे जाणे हेच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आहे, असे गडकरी म्हणाले.
पुढे बोलतांना गडकरी म्हणाले, जीवनात अनेक आव्हाने असतात. या आव्हानांचा सामना करत पुढे जाणे हीच जीवन जगण्याची कला आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या आत्मचरित्रातील एक गोष्ट सांगितली. निक्सन यांच्या पुस्तकात म्हटले आहे की, माणूस पराभूत होतो तेव्हा संपत नाही, तो जेव्हा थांबतो तेव्हा संपतो. राजकारण आणि कॉर्पोरेट क्षेत्रात कुणीही समाधानी नाही. असंतुष्ट आत्म्यांना शांत करण्यासाठी एकाच उपाय आहे तो म्हणजे आर्ट ऑफ लिविंग, असे नितीन गडकरी म्हणाले. शांती आणि समाधानाने जीवन जगण्याचे सूत्र ज्याला समजले तो आजघडीला आनंदी माणूस असल्याचेही गडकरी म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आहे, निकाल लागलेले आहेत. महायुतीला निर्भेळ यश मिळालेले असताना शपथविधी ची जय्यत तयारी सुरू आहे. असे असतांना राजकारण हे क्षेत्र असंतुष्ट आत्म्यांचा सागर असल्याचे सांगून विशेषत: मंत्रिपदासाठी लॉबिंग लावणाऱ्या नेत्यांना गडकरी यांनी नेहमीच्या खास अंदाजात चिमटे काढले आहेत.