रेशनिंगगचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जातांना रंगेहाथ पकडले, सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील घटना.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/११/२०२४
गोरगरीब व सर्वसामान्य माणसाला दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्याच्या हेतूने शासनाने स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून धान्य वाटप करुन ते घराघरात पोहचवण्यासाठी व्यवस्था केली आहे. परंतु एका बाजूला उपासमारीमुळे ज्यांच पोट पाठीला भिडलय त्यांना वेळेवर व पुरेसे धान्य मिळत नाही तर दुसरीकडे ज्या गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटपाचे काम सोपवले आहे तेच या धान्याचा काळाबाजार करुन मलिदा खात असल्याने त्यांची पोट मोठी झाली असून यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी आयता मलिदा खात असल्याचे या सगळीकडे होणाऱ्या धान्य वाटप घोटाळ्यावरुन दिसून येत आहे.
स्वस्त धान्य वितरणाचा सावळागोंधळ सगळीकडे दिसून येत असून असाच काहीसा प्रकार काल सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे उघडकीस आला असून काल दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ शुक्रवार रोजी जरंडी येथील सुज्ञ नागरिकांनी रेशनिंगचा तांदूळ व गव्हाचे पोते घेऊन जाणारे चारचाकी वाहन तसेच या वाहनाच्या मागोमाग धान्य घेऊन जाणाऱ्या तीन मोटारसायकली पकडून सोयगाव पोलीसांच्या ताब्यात दिल्याने सोयगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सोयगाव व पाचोरा तालुक्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात स्वस्त धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु असून ‘पकडा गया वो चोर है, बाकी सब शिरजोर है’ असा प्रकार सुरु असून या स्वस्त धान्याच्या काळाबाजाराला पुरवठा विभागातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांचा अर्थपूर्ण कानाडोळा असल्याने सोयगाव तालुक्यातील जरंडी येथून काही इसम एका चारचाकी वाहनातून तसेच काही इसम या दुचाकीवरुन धान्य घेऊन जातांना आढळून आले याबाबत जरंडी येथील काही सुज्ञ नागरिकांना संशय आल्याने त्यांनी चारचाकी वाहन व दूचाकीस्वारांना थांबवून गाडीत भरलेल्या गोण्या तपासल्या असता त्यामध्ये रेशनिंगचा तांदूळ व गहू तर काही प्रमाणात अंगणवाडीत वाटण्यात येणारे धान्य आढळून आले.
सदरचे धान्य हे रेशनिंग व अंगणवाडी शालेय पोषण आहारातील असल्याचा संशय आल्याने संबंधित सुज्ञ नागरिकांचा संताप अनावर झाला व त्यांनी संबंधित वाहनचालक व दुचाकीस्वारांना रंगेहाथ पकडून त्यांना लगेचच जरंडीचे उपसरपंच संजय पाटील, माजी पंचायत समितीचे सदस्य संजीवजी सोणवने यांच्या स्वाधीन केले संबंधित वाहनांसह त्यांना ताब्यात घेऊन दिलीप पाटील यांनी सोयगाव पोलीस स्टेशनला सविस्तर माहिती दिली घटनास्थळी येण्यासाठी विनंती केली.
परंतु फोन केल्यावरही सोयगाव पोलीसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता तब्बल चार तासांनंतर त्यांनी प्रत्येक्ष घटनास्थळी हजेरी लावली यामुळे तेथील उपस्थित सुज्ञ नागरिकांनी सोयगाव पोलीसांच्या या दिरंगाई बद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त आलेल्या पोलीसांना रेशनिंगचे धान्य घेऊन जाणारे चारचाकी वाहन व दोन दुचाकी तसेच सोबत हे धान्य वाहून नेणाऱ्या लोकांनी पोलीसांच्या स्वाधीन केले.
पोलीसांनी लगेचच रेशनिंगच्या धान्याच्या गोण्या भरलेले चारचाकी वाहन ओम्नी गाडी क्रमांक एम. एच~४३, व्ही~६२८८ तसेच मोटारसायकल क्रमांक एम. एच. २० बी. ००८२ एम. एच. २० ए व्ही ९४८२, व एम. एच. २० ए. यु. ९६७९ या तीन दुचाकी ताब्यात घेऊन सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील रहिवासी असलेले अफरोज हमीद शेख, समीर हमीद शेख, मिरज खलील शेख, जुबेर शेख तसेच सोयगाव तालुक्यातील निंबायती येथील इक्बाल तडवी, सोयगाव येथील शेख नजीम शेख चांद व इतर चार अशा दहा जणांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून ०३ गोण्या गहू, ०७ गोण्या तांदूळ, अंगणवाडी पोषण आहाराच्या ०२ गोण्या, ०१ गोणी ज्वारी असे रेशनिंग व अंगणवाडीचा मिळून एकूण ११ क्विंटल धान्य मुद्देमाल जप्त केला असून पुढील कारवाईसाठी संबंधित विभागाकडे अहवाल मागितला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
असे असले तरी काल रात्री उशिरापर्यंत सोयगाव स्टेशनला गुन्हा दाखल करुन घेण्यात आला नव्हता अशी माहिती समोर येत असून जरंडी येथील सुज्ञ नागरिक व उपसरपंच संजय पाटील यांनी सोयगावच्या तहसीलदार मा. मनीषा मेने व सोयगाव पोलीस स्टेशनला भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून पकडून दिलेली वाहने व रेशनिंगच्या तसेच अंगणवाडी पोषण आहाराची सखोल चौकशी करुन पकडण्यात आलेल्या संशयित इसमांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती.
मात्र तक्रार करुनही मा. तहसीलदार मनीषा मेने मॅडम यांनी आमच्या तक्रारीची पाहिजे तशी दखल घेतली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला असून हा प्रकार राजकीय दबावाखाली आणून दडपला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून या धान्याचा काळ्या बाजाराची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे सोयगाव व सिल्लोड तालुक्यात रेशनिंगचे धान्य व अंगणवाडीच्या पोषण आहाराचा काळाबाजार करणारी एक टोळी सक्रिय असून या टोळीला राजाश्रय दिला जात असल्याने इच्छा असूनही संबंधित अधिकारी व कर्मचारी कारवाई करु शकत नाही अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.