मुख्यमंत्रीपद एकनाथराव शिंदेंना न दिल्यास भविष्यात भाजपाला कांदे विकावे लागतील.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/११/२०२४
*************************************************
(एकनाथराव शिंदे यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवले तर नक्कीच भविष्यात भारतीय जनता पक्षाला कांदे विकावे लागतील अशी खोचक टीका सर्वसामान्य जनतेच्या तोंडून ऐकावयास मिळते आहे.)
*************************************************
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला तसेच शिंदे शिवसेनेला बहुमत मिळाले आहे. परंतु भारतीय जनता पक्षाला जास्त जागा मिळाल्याने मुख्यमंत्रीपद भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले पाहिजे याकरिता भारतीय जनता पक्ष ठाम आहे. मात्र महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले हे जरी खरे असले तरी हे बहुमत फक्त आणि फक्त एकनाथराव शिंदे यांच्यामुळे मिळाले आहे हे निर्विवाद सत्य आहे. परंतु आता सत्ता हाती आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा जुना ‘सुप्त गुण उफाळून आला असून वापरा आणि फेका किंवा घरात घेऊन तोंड दाबून मुक्याचा मार देण्याचे’ कटकारस्थान सुरु केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
महत्वाचे सांगायचे झाले तर आजही भारतीय जनता पक्षाबद्दल महाराष्ट्रातील जनता विशेष करुन शेतकरी वर्गातून कमालीची नाराजी आहे. परंतु माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी लाडकी बहिण योजना व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीचे पैसे टाकल्यामुळे जनतेतून व शेतकरी वर्गातून भारतीय जनता पक्षाबद्दलचा रोष थोडा कमी झाला व या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी पैशांचा पाऊस पाडून दारुच्या महापुरात तसेच कुठे दडपशाही, कुठे फोडाफोडी तर काही ठिकाणी काम, दाम, दंड, भेद अशा बळांचा वापर करुन आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.
ही परिस्थिती पाहता महायुतीला बहुमत मिळाले यामागील कारण सर्व महाराष्ट्रातील जनतेतून एकच आशा आहे की एकनाथराव शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील व भविष्यात शेतीप्रधान म्हटल्या जाणाऱ्या देशातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल परंतु देवेंद्र फडणवीस यांनी (मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन) हि जुनी कॅसेट पुन्हा बाहेर काढल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेतून तिव्र नाराजी व्यक्त केली जात असून जर का एकनाथराव शिंदे यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवले तर नक्कीच भविष्यात येणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत वेगळा कौल पाहायला मिळेल व याचे परिणाम भविष्यात भारतीय जनता पक्षाला भोगावे लागतील कारण या महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती या सर्व निवडणुकीत यश मिळवणे गरजेचे आहे कारण हाच लोकशाहीचा मुख्य पाया आहे. म्हणून एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री नाही झाले तर भविष्यात भारतीय जनता पक्षाला कांदे विकावे लागतील अशी खोचक टीका सर्वसामान्य जनतेच्या तोंडून ऐकावयास मिळते आहे.
तसेच महत्वाचे म्हणजे महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरत नसल्याने लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता लांबणीवर पडला असून तो कधीपर्यंत मिळणार या आशेवर लाडक्या बहिणी हिरमुसल्या आहेत. कारण विधानसभा निवडणुकांच्या आधी शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्यातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच महिन्यांचे पैसे वितरित करण्यात आले आहेत. व आता अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे ३० नोव्हेंबरला किंवा एक डिसेंबरला महाराष्ट्र सरकारचा शपथविधी होऊ शकतो अशी आशा व्यक्त केली असल्याने डिसेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होईल असे दिसते.
असे असले तरी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेचे पैसे निवडणुकांचे निकाल लागल्याबरोबर म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यात खात्यावर जमा होतील असे सांगितले होते. मात्र महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटत नसल्याचे चित्र दिसून येत असून येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्रीपदाचा चेहऱ्याबाबत महायुतीकडून अंतीम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून नंतर शपथविधी सोहळा होईपर्यंत तरी लाडक्या बहिणींना आपल्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट बघावी लागणार आहे.