केसरबाई रघुनाथ दांडगे या वयोवृद्ध महिलेचा जंगली श्वापदाच्या हल्यात मृत्यू झाल्याचा संशय.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/११/२०२४
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथील रहिवासी केसरबाई रघुनाथ दांडगे वय वर्षे अंदाजे सत्तर या महिलेचा कुऱ्हाड येथून जवळच असलेल्या राखीव जंगलात मृतदेह आढळून आला असून या महिलेचा अकस्मात मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत असली तरी या महिलेचा एखाद्या जंगली श्वापदाच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कुऱ्हाड बुद्रुक येथील गोठाण परिसरात राहाणारी अंसाबाई रघुनाथ दांडगे वय वर्षे सत्तर यांना एक मुलगा व मुलगी असून या महिलेच्या मुलाचा मृत्यू झाला आहे तर मुलगी सासरी नांदत आहे. तसेच गावात सुन व तीची दोन मुले रहातात परंतू सुन सुध्दा साधी भोळी असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे अंसाबाई दांडगे ह्या एकट्याच रहात होत्या व घरात सरपण किंवा इतर दैनंदिन कामानिमित्ताने त्या घराबाहेर पडत होत्या परंतु आज एका महिलेचा मृतदेह जंगलात पडला असल्याची माहिती वनमजूर चंद्रकांत कोळी यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला दिली होती या खबरीवरुन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे साहेब त्यांचे सहकारी अमोल पाटील, राहुल बेहेरे, अतुल पवार, अरविंद मोरे यांच्यासह लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शुभम तेली, नांद्रा परिक्षेत्रचे वनपाल प्रकाश देवरे साहेब, लोकमतचे प्रतिनिधी सुनील लोहार यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली असता संबंधित महिला ही केसरबाई रघुनाथ दांडगे असल्याची ओळख पटली असून मृतदेह कुजलेले अवस्थेत आढळून आला असल्याने वैद्यकीय अधिकारी शुभम तेली यांनी जागेवर शवविच्छेदन केले असून लगेचच जागेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
असे असले तरी संबंधित महिला काही दिवसांपूर्वी घरातून गेली होती परंतु ती एकटीच रहात असल्याने ती महिला कुठेतरी बाहेरगावी गेली असेल म्हणून कुणीही तपास केला नाही व आज संबंधित महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वनमजूर चंद्रकांत कोळी यांना आढळून आल्याने त्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरुन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी मात्र संबंधित महिलेवर कदाचित जंगली श्वापदाने हल्ला केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेबाबत पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे हे करीत आहेत.