पाचोरा तालुक्यात महिलाराज नावाला आणि पतिराज छळतात गावाला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/११/२०२४
पाचोरा तालुक्यातील बऱ्याचशा ठिकाणी महिला पदाधिकारी आहेत तर काही गावात महिला पोलीस पाटील आहेत. असे असले तरी बऱ्याचशा गावाच्या ग्रामपंचायतीवर महिला सरपंच असल्यातरी त्यांच्या जागी त्यांचे पती किंवा त्यांच्या कुटुंबातील एखादी जैष्ठ, श्रेष्ठ व्यक्ती खुर्चीवर बसून मासिक मीटिंग व ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी बसून बिनधास्तपणे निर्णय घेतात महिला सरपंच ह्या फक्त आणि फक्त सही करण्यापुरत्या मर्यादित असतात अशी परिस्थिती सगळीकडे दिसून येते.
तसेच पाचोरा तालुक्यात बऱ्याचशा गावांसाठी महिला पोलीस पाटलांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे लोकशाही राज्यात पोलीस पाटील यांची भुमिका अत्यंत महत्वाची असून सर्वसामान्य जनता, प्रशासन व शासनाच्या मध्ये महत्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटलांकडे पाहिले जाते मात्र बऱ्याचशा गावातील महिला पोलीस पाटील या फक्त नावालाच उरल्या असल्याचे खात्रीलायक वृत्त असून त्यांच्या जागेवर त्यांचे पती किंवा घरातील प्रमुख व्यक्ती कामकाज पहात आहे.
या प्रकारामुळे (सगळ्याच) नाही परंतु काही महिला पोलीस पाटलांचे पती किंवा घरातील जबाबदार व्यक्ती जे पोलीस पाटलांच्या कामकाजात हस्तक्षेप करतात हा प्रकार येथेच थांबत नाही तर सण, उत्सव निवडणूक कालावधीत किंवा इतर संवेदनशील विषय उद्भवल्यास जेव्हा मिटींग घेतल्या जातात त्या मिटींगमध्ये महिला पोलीस पाटलांच्या वतीने त्यांचे पती किंवा घरातील जेष्ठ व्यक्ती उपस्थित राहुन सरळसरळ महिला पोलीस पाटलांची खोटी सहि करुन हजेरी लावून घेतात व हा गैरप्रकार संबंधित पोलीस स्टेशनचे जबाबदार अधिकारी उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.
तसेच व्यक्ती काही राजकारणी आहेत तर काही व्यक्ती आपले हितसंबंध जपण्यासाठी गावात सुरु असलेले अवैध धंदे म्हणजे सट्टा, मटका, गावठी हातभट्टीची दारु विक्री, जुगाराचे अड्डे याबाबत खरी माहिती पोलीसांना देत नसल्याने गावागावात अवैध धंदे वाढले असल्याने गावागावात अल्पवयीन मुलांसह जेष्ठ नागरिक व तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जाऊन दररोज शेकडो घरे उध्दवस्त होत आहेत. तसेच गावात काही भांडणतंटे झाल्यावर महिला पोलीस पाटलांचे नातेवाईक स्वताचे हितसंबंध जपण्यासाठी पोलीस स्टेशनला खोटी माहिती देऊन खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे असा प्रकार करत असल्याने जनमानसातील पोलीस व कायद्यावरचा विश्वास कमी होत चालला असल्याचे सांगितले जात असून महिला राज नावाला व पतीराज छळतात गावाला असे म्हटले तर ते अजिबात वावगे ठरणार नाही.
म्हणून शासन व प्रशासनाने जो हेतू डोळ्यासमोर ठेवून महिला सरपंच व महिला पोलीस पाटलांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत तो हेतू साध्य होत नसल्याने गावातील ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठा घोळ होत आहे तसेच महिला पोलीस पाटील काम पहात नसल्याने त्याजागी दुसरेच काम पहात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचे दिसून येत म्हणून महिला सरपंच व महिला पोलीस पाटलांना लेखी स्वरुपात सुचना देऊन त्यांच्या पदाची जबाबदारी लक्षात आणून दिली तर ते योग्य राहील अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.