आज दिसतील असेही दलाल, जिकडे गुलाल, तिकडे हलाल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/११/२०२४
सन २०२४ ची विधानसभा निवडणुक कधी नव्हे इतकी चुरशीची दिसून आली. कारणही तसेच होते पाचोरा, भडगाव विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे इतके म्हणजे १२ उमेदवार उभे होते. यात आजी, माजी, काही नवख्या उमेदवारांसह हाजी, हाजी करणाऱ्या म्हणजे कुणीतरी उभे केलेल्या उमेदवारांची संख्या जास्त दिसून येत होती.
म्हणून या विधानसभा निवडणुकीत आपापले वर्चस्व सिध्द करण्याच्या प्रयत्नात सगळ्यांनीच ओल्या पार्ट्या देऊन मते मिळवून घेण्यासाठीच्या प्रयत्नात सगळीकडे पैशांचा पाऊस व दारुचा महापूर आला होता परंतु याच पैशाच्या पावसात व दारुच्या महापुरात ज्याला लोकशाहीमध्ये आपण ‘मतदार राजा’ म्हणतो तोच राजा आपल देशप्रेम, निष्ठा, इमानदारी, प्रतिष्ठा, नितीमत्ता गहाण ठेवून दररोज वेगवेगळ्या मंडपात मेजवानी घेतांना दिसून येत होता याचे भक्कम पुरावे प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद आहेत. हे असे घडण्यामागचे कारण म्हणजे प्रत्येक उमेदवाराने आपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी महिला, पुरुषांना व अल्पवयीन मुले, मुलींना रोजंदारीवर लावून आपल्या रॅली व प्रचारसभेत जास्तीत, जास्त गर्दी जमवून आपले शक्ती प्रदर्शन केले.
हे करत असतांना सगळ्याच उमेदवारांनी घराघरात जाऊन प्रचार करण्यासाठी महिला, पुरुषांना हाताशी धरुन किंवा रोजंदारीवर आणून घराघरात आपल्या पक्षाचे व चिन्हांचे प्रचारपत्रक देऊन प्रचार करुन घेतला यावेळी कोण, कोणाचा प्रचार करतय हे उघड, उघडपणे दिसून येत होते. याच दरम्यान काही प्रचारकांनी तर आपणच उमेदवार आहोत अशी भुमिका घेत विरोधकांशी स्पर्धा करत हमरीतुमरीवर येऊन हातापायी करण्यापर्यंत मजल गाठली होती.
आता मतदान झाले व आज मतमोजणी होऊन कोण विजयी होतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी मागिल प्रचाराच्या कालावधीत फुकटचे खाणाऱ्या, पिकणाऱ्यांना चटक लागली असल्याने आता कुणीही विचारायला तयार नाही म्हणून शेवटी, शेवटी का होईना मौजमस्ती करुन घेण्यासाठी आपण कुणाचे निष्ठावंत कार्यकर्ते होतो, आपण कुणाचा प्रचार केला हे सगळं विसरुन आज जो कुणी उमेदवार विजयी होईल त्याला खांद्यावर घेऊन वाचण्यासाठी कंबर कसली आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर ‘जिकडे गुलाल, तिकडे हलाल’ होण्याची तयारी करुन ठेवली आहे.
ही परिस्थिती पाहता नेतेमंडळींना दोष देण्यापेक्षा आपणच ज्याला लोकशाहीचा पाया म्हणतो तोच मतदार राजा याला जबाबदार आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.