पिंपळगाव हरेश्वर येथे घडतोय असाही चमत्कार, गरुडा समोर हात जोडताच पडतोय पैशांचा पाऊस.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/११/२०२४
आजपर्यंत आपण मोठमोठ्या धार्मिक कार्यक्रमात संत, महंत तसेच काही ठिकाणी नेते मंडळींच्या सत्कारासाठी रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या कृत्रिम गरुड पक्षाचा वापर करुन या पक्षाच्या पंखांतून पुष्पवृष्टी होतांना किंवा चोचीत हार अडकून सत्कारमूर्तीच्या गळ्यात हार टाकून सत्कार केला जात असल्याचे दृश्य आपण पाहीले असेल परंतु पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राच्या मागील बाजूस वेगळाच चमत्कार घडत असून याठिकाणी गरुडासमोर हात जोडताच पैशांचा पाऊस पडत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून हा चमत्कार पहाण्यासाठी व पदरात पैसे पाडून घेण्यासाठी त्याठिकाणी एकच गर्दी उसळली होती अशी माहिती समोर येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया सुरु होणार असून पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. यामागील कारण म्हणजे पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघात कधी नव्हे इतके इच्छुक उमेदवार उभे असून यात आजी, माजी आमदार व इतर नवख्या चेहेऱ्यांचा समावेश असून एकूण उमेदवारांची संख्या बारा आहे.
या चुरशीच्या निवडणुकीत आजी, माजी आमदार व इतर उमेदवारांनी कंबर कसली असून काही उमेदवारांनी आपल्याला जास्तीत, जास्त मते कशी मिळवता येतील याकरिता मागील आठ दिवसांपासून बकऱ्या, कोंबड्यांचे बळी व सोबत दारुची बाटली देऊन ओल्या पार्ट्या देऊन तसेच रोख रक्कम देऊन मते वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. यामुळे सद्यस्थितीत पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघात पैशांचा पाऊस व दारुचा महापूर आला असल्याचे चित्र दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार काल रात्री पिंपळगाव हरेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राच्या मागील बाजूस संध्याकाळ पासून तर रात्री साडे दहा वाजेपर्यंत सुरु होता.
विशेष म्हणजे पिंपळगाव हरेश्वर येथील एका इसमाने
भडगाव तालुक्यातील एका उमेदवाराच्या प्रचारासाठी व मते मिळवून देण्यासाठी तब्बल वीस लाख रुपये आणले असल्याचे खात्रीलायक वृत्त असून मतदारांना वळवण्यासाठी या पैशांचे वाटप केले जात आहे. हा आणलेला पैसे मतदारांना देण्यासाठी गावातील काही तरुणांना हाताशी धरुन एक साखळी तयार करुन मतदारांना बोलावून घेत संबंधित उमेदवाराचा पक्ष सांगून व चिन्ह दाखवून या चिन्हावर मतदान करा असे सांगत प्रत्येक मतदाराला ऐपत पाहून ५००/०० ते २०००/०० रुपयांचे वाटप करण्यात आले. ही वाटप दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ मंगळवार रोजी सायंकाळपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत बिनधास्तपणे सुरु होती.
याची माहिती काही सुज्ञ नागरिकांनी जळगाव कंट्रोल रुम तसेच पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन व कळवली सत्यजित न्यूजला कळवली ही माहिती मिळताच दिलीप जैन यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता स्वामी समर्थ केंद्राच्या मागे एक इसम अंधारात उभा राहून पैसे वाटप करतांना दिसून आला. तसेच ही पैसे वाटप सुरु असल्याने त्याठिकाणी एकच गर्दी जमलेली होती. याच वेळात काही तरुणांनी जळगाव कंट्रोल रुम व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला संपर्क केला मात्र सगळे कर्मचारी व अधिकारी बंदोबस्त कामी अडकले असल्याने ते वेळेवर पोहोचू शकले नाही.
आपण पैसे वाटप करत आहोत ही बाब पोलीसांना कळाली असल्याचे समजताच संबंधित गरुडाने तेथून गरुडझेप घेत घरट्यात जाऊन घरट्यात अंधार करुन घेत स्वताला कोंडून घेतले परंतु याच वेळात ही घटना सत्यजित न्यूजच्या कॅमेरा मध्ये कैद करण्यात आली असून घटनास्थळी अंधार असल्याने छायाचित्रात ठळक चेहरे दिसत नाही. असे असले तरी संबंधित इसमावर पाळत ठेवून किंवा त्याच्या घराची झाडाझडती घेतल्यास नक्कीच लाखो रुपये हाती लागतील अशी शक्यता सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.