भडगाव तालुक्यातील एका शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात मटण व दारुची मेजवानी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/११/२०२४
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून उमेदवारांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यापासून आपल्याला जास्तीत जास्त मते मिळवून घेण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून मतदारांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. विशेष हे मतदानाचा टक्का वाढण्यासाठी सगळ्याच इच्छुक उमेदवारांनी मतदारांना खुश करण्यासाठी पार्ट्या देण्याचा जोरदार धडाका लावला असल्याचे दिसून येत असून असाच काहीसा ओली पार्टी देण्याचा प्रकार पाचोरा, भडगाव विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या व भडगाव तालुक्यातील एका उमेदवाराने दोन दिवसांपूर्वी केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
*************************************************
जागेच पावित्र्य जपण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे
*************************************************
या उमेदवाराने मतदारांना जेऊ, खाऊ घातले याला आमचा विरोध नाही परंतु हे करत असतांना आपण सुसंस्कारित पिढीतील आहोत, आम्ही नवतरुणांच भविष्य घडवण्यासाठी विविध शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भडगाव तालुक्यात ज्ञानगंगा आणली आहे अशी शेखी मिरवून घेणाऱ्या प्रतिष्ठीत उमेदवाराने म्हणा किंवा त्यांच्या अती उत्साही कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात चक्क ज्या ठिकाणी मुलांना घडवण्यासाठी चे कार्य करणारे शिक्षक घडवले जातात त्याच ठिकाणी विद्यामंदिराच्या प्रांगणात मतदारसंघातील मतदारांना खूश करण्यासाठी मटणाच्या जेवणासोबत दारुची पार्टी दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून हि मेजवानी देण्याची जबाबदारी एका शिक्षकावर सोपविण्यात आली होती अशी माहिती समोर येत असल्यामुळे या बाबत सुज्ञ नागरिकांनी तीव्र शब्दांत संतप्त प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली असून जागेच पावित्र्य न जपता सत्तेसाठी इतका खाली जाणारा उमेदवार जर आपण निवडून दिला तर सत्ता मिळाल्यावर हे अजून काय, काय धिंगाणा घालतील अशी शंका उपस्थित केली जात आहे.
असाच काहीसा प्रकार मतदारांकडून मते मिळवून घेण्यासाठी व त्यांचे मन वळवण्यासाठी त्यांना आमंत्रित करुन बोलावून घेत जेऊ, खाऊ घालणं हे वावग नाही. परंतु हे करत असतांना उमेदवारांनी संस्कृती, संस्कार, नितीमत्ता याचे भान न ठेवता कंबरेच सोडून डोक्याला बांधुन सगळी काही गहाण ठेवून मतदारांना देण्यात येणाऱ्या दररोजच्या मेजवानीत बोकड, कोंबडे कापून त्याची मेजवानी सगळीकडे बिनधास्तपणे दिली जात आहे.
आमचा मांसाहार करण्याला व मांसाहाराच्या मेजवानी देणारांना अजिबात विरोध नाही कारण जो, तो ज्याच्या, त्याच्या आवडीनिवडी नुसार आहार घेऊ शकतो परंतु या मेजवानी देतांना सगळ्याच नाही काही उमेदवार व कार्यकर्त्यांनी याच मेजवानी मध्ये दारुच्या बाटल्याच नव्हे तर गावठी हातभट्टीच्या दारुचे कॅनचे, कॅन भरुन जेणवावळीत आलेल्या मतदारांना मनसोक्त दारु पाजली जात आहे. हे करत असतांना या ठिकाणी आलेला तरुण वर्ग, अल्पवयीन मुले, निर्व्यसनी लोकांनाही दारु पाजण्यासाठी आग्रह केला गेला व दारु पिण्यासाठी भाग पाडले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
************************************************
(संबंधित घटनेचे काही जीओ टॅग छायाचित्रे व चित्रफिती सत्यजित न्यूजच्या हाती आले आहेत. परंतु त्या फोटो व चित्रफितीत या मेजवानीत सामील असलेल्या सर्वसामान्य लोकांचा सहभाग आहे व त्यांना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेसमोर दाखवणं आमच्या मनाला व संस्कृतीला पटत नसल्याने आम्ही ते टाळत आहोत.
************************************************