चारित्र्यावर संशय घेत पतीने केला पत्नीचा खून, पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील घटना.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/११/२०२४
पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे काही परप्रांतीय कुटुंब मजूरी करण्यासाठी आलेले आहेत. असेच एक मजूर कुटुंब गोराडखेडा येथील शेत शिवारात वास्तव्याचा होते. या कुटुंबातील पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यामध्ये सतत भांडणतंटे होत होते अशी माहिती समोर येत असून याच भांडणाचा राग मनात ठेवून व चारित्र्याचा संशयातून घरात पत्नी एकटी झोपलेली असतांना तीच्या पतीने रुमालाने गळा आवळून तीचा खुन केला असल्याची घटना दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ शुक्रवार रोजी मध्यरात्री उघडकीस आली असून या घटनेत संशयीत आरोपी मयत महिलेच्या पतीला पाचोरा पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मध्यप्रदेशातील कुसम्या येथील रहिवासी भाया ऊर्फ भैय्या चव्हाण वय वर्षे (५८) व त्याची पत्नी सैय्यदीबाई वय वर्षे (५२) हे पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील चंद्रकांत पाटील यांच्या शेतात मोलमजुरी करण्यासाठी आलेले होते व ते शेतातच वास्तव्याला होते. परंतु भाया ऊर्फ भैय्या चव्हाण हा त्यांची पत्नी सैय्यदीबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरुन त्यांचे सतत भांडणतंटे होत असत कधीकधी भाडणाचे रुपांतर हाणामारीत होत होते अशी माहिती आसपासच्या शेतात काम करणाऱ्या मजूरांच्या व शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.
याच संशयाच्या कारणावरुन दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ शुक्रवार रोजी सायंकाळी भाया ऊर्फ भैय्या चव्हाण व त्याची पत्नी सैय्यदीबाई कडाक्याचे भांडण झाले होते. सायंकाळी भांडण शांत झाले मात्र या भांडणाचा राग भाया ऊर्फ भैय्या चव्हाण याच्या डोक्यात होता व रागाच्या भरात त्याच रात्री मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास भाया ऊर्फ भैय्या चव्हाण याने पत्नी सैय्यदीबाई घरात गाढ झोपेत झोपली असल्याचा फायदा घेत तीच्या गळ्याला रुमाल आवळून तीचा निर्घृणपणे खुन झाल्याची घटना उघडकीस आली होती.
या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करुन संशयित आरोपी भाया ऊर्फ भैय्या चव्हाण वय वर्षे (५८) याला ताब्यात घेतले. त्यानंतर शेतमालक चंद्रकांत काशिनाथ पाटील वय वर्षे (३२) राहाणार गोराडखेडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी भाया ऊर्फ भैय्या चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार व त्यांचे सहकारी करत आहेत.