भडगाव तालुक्यातील उमेदवाराच्या कार्यकर्त्यांची परिस्थिती म्हणजे लाखों की बाते वडा-पाव खाते.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/११/२०२४
पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघात कधी नव्हे इतके उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांची वाढती संख्या व चाललेली चढाओढ पाहून सगळीकडे कलगीतुरा रंगला आहे असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच राजकीय चढाओढीत काही संधीसाधू लोकांनी काही नवख्या उमेदवारांच्या संपर्कात जाऊन मी तुमच्यासाठी काय करु शकतो अशी शेखी मिरवून गोरगरिबांना वेगवेगळे अमिष दाखवून फक्त चहा, पाण्यावर मागे फिरवून त्यांच्या नावाखाली उभ्या असलेल्या नवख्या उमेदवारांकडून तीनशे ते पाचशे रुपये रोजंदारी प्रमाणे पैसे घेऊन मधल्यामध्ये दलाली खात असल्याची बाब उघडकीस आली आहे.
याबाबत दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी पाचोरा येथे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी घेण्यात आलेल्या मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी महिलांना चारशे तर पुरुषांना पाचशे रुपये रोजंदारी कबूल करुन मेळाव्याच्या ठिकाणी आणण्यासाठी मालवाहू टेम्पो मधून गुराढोरासारखी वाहतूक करत आणून सोडले होते. मात्र जाहीर सभा आटोपल्यावर संबंधित उमेदवाराच्या प्रतिनिधींनी संबंधित महिला व पुरुषांना दोनशे ते तीनशे रुपये देऊन तर काही महिला पुरुषांना पैसे न देताच हाकलून लावल्याचा प्रकार उघडकीस आला होता व याची दखल घेऊन सत्यजित न्यूज कडून या घडलेल्या प्रसंगावर सडेतोड वृत्तांकन करण्यात आले होते.
असाच काहीसा प्रकार पाचोरा विधानसभा मतदारसंघात सगळीकडे दिसून येत असून पिंपळगाव हरेश्वर गावात उघडकीस आला असून मागे काही दिवसांपूर्वी पिंपळगाव हरेश्वर येथील एका चाणाक्ष व्यक्तीने पाचोरा, भडगाव विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या भडगाव तालुक्यातील एका उमेदवाराला मोठमोठी आश्वासने देऊन पिंपळगाव हरेश्वर गावात आणून शक्ती प्रदर्शन करण्यासाठी गोरगरिबांना नको, नको ती आश्वासने देऊन विविध प्रलोभने दाखवून तसेच रोजंदारीवर महीला, पुरुष, तरुण, तरुणींना आणून रॅली काढली होती.
परंतु संबंधित उमेदवाराच्या रॅली मध्ये गर्दी जास्तीत, जास्त जमवण्यासाठी महिला, पुरुष, तरुण, तरुणींना भुलथापा देऊन त्यांना कबूल केल्याप्रमाणे रोजंदारीचे न देता फक्त शंभर ते दोनशे रुपये देऊन त्यांना हाकलून लावले तसेच रॅली आटोपल्यावर तुम्हाला जेवणाची व्यवस्था केली आहे असे सांगितले होते मात्र बऱ्याचशा येणाऱ्या महिला, पुरुषांना साधे पाणी सुध्दा मिळाले नसल्याने त्यांनी सरतेशेवटी शिव्यांची लाखोली वाहिली होती अशी चर्चा जनमानसातून ऐकावयास मिळत आहे.
ही परिस्थिती पाहता भडगाव तालुक्यातील उमेदवाराच्या कार्यकर्त्यांची परिस्थिती म्हणजे लाखो की बाते वडा, पाव खाते अशी झाली असून संबंधित संबंधित चाणाक्ष हुशार व्यक्ती मतदान मिळवून देण्यासाठी परस्पर पैसे हडप करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.