कुंपणानेच खाल्ले शेत, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकातील लाच घेणारे पाच अधिकारी निलंबित.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/११/२०२४
“नंगे को खुदा (परमेश्वर) डरे” अशी एक म्हण आहे व म्हणीप्रमाणे तसा अनुभव आता सर्वसामान्य जनतेला येत आहे. कारण सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूकीचा धुमधडाका सुरु आहे. या निवडणुकीत कुठेही भ्रष्टाचार, कुणावरही दबावतंत्र किंवा वेगवेगळे आमीष दाखवून म्हणजेच पैशांची देवाणघेवाण करुन किंवा इतर मार्गाने मतदारांना प्रलोभने दाखवून मतदान मिळवून घेत असेल तर अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
असे असतांनाही सगळेच नव्हे तर काही उमेदवारांनी आचारसंहिता खुंटीला टांगून ठेवत शक्ती प्रदर्शनाच्या नावाखाली मोठमोठे मेळावे, रॅली काढण्याचा धुमधडाका सुरु केला आहे. याकरिता मोठ्या संख्येने जनसमुदाय जमवण्यासाठी महिला, पुरुषांना वेगवेगळे आमीष दाखवून तसेच उघड, उघडपणे ५००/०० रुपये रोजंदारीवर हजारो महिला व पुरुषांना गाड्यांमध्ये गुराढोरांसाखे भरुन मेळाव्यात व रॅली मध्ये सामील होण्यासाठी घेऊन जातांना दिसुन येत आहे.
हा गैरप्रकार येथेच थांबत नसून मतदारांना खुश करण्यासाठी ओल्या पार्टीचे आयोजन केले जात असून यात बोकड, कोंबड्यांचा बळी देत सोबत दारु पाजली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ह्या ओल्या पार्टीचे आयोजन करतांना या पार्टीत अल्पवयीन व ज्यांना साध्या सुपारीचे व्यसन नाही अशी मुले दारु पित असल्याचे दिसून येते. यामुळे लोकशाही जीवंत आहे की नाही याची काळजी वाटते विशेष म्हणजे या निवडणुका सुटसुटीत, भयमुक्त व लोकशाहीच्या मार्गाने व्हाव्यात म्हणून स्वतंत्रपणे निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली असून या आयोगाने काटेकोरपणे कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
************************************************
कुंपणानेच खाल्ले शेत, निवडणुक आयोगाच्या भरारी पथकातील लाच घेणारे पाच अधिकारी निलंबित.
***********************************************
परंतु निवडणूक काळातच निवडणूक यंत्रणेच्या विश्वासाला तडा जाणारे कृत्य समोर आले असून यात ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये ही घटना घडली असून फुले विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यवसायीकाला लाच मागणाऱ्या निवडणुक आयोगाच्या पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.
याबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर परिसरात बबन आमले फुले विक्रीचा व्यवसाय करतात सद्यस्थितीत निवडणुकीच्या तोंडावर हार, तुरे, विविध कार्यक्रमांसाठी फुलांची उधळण करण्यासाठी फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बबन आमले हे मोठे फुले विक्रीते आहेत म्हणून ते शेतात फुलांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांची रक्कम देण्यासाठी जात असतांनाच निवडणूक आयोगाच्या दोन भरारी पथकाच्या प्रमुखांनी बबन आमले हे कारमधून जात असतांना तपासणीसाठी थांबवले.
गाडी थांबवून भरारी पथकाने गाडीची तपासणी केली असता बबन आमले यांच्या कारमध्ये असलेल्या बॅगमध्ये मोठी रक्कम आढळून आली असे असले तरी
फुले विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या बबन आमले यांना कोणतीही कल्पना नसतांना तसेच जवळ असलेला पैसा व्यवसायानिमित्त घेऊन जात असल्याचे सांगितले व ही रक्कम स्वताची असल्याचे सांगितले व तशी कागदपत्रांची पूर्तता केली परंतु तरीही निवडणूक काळात एवढी रक्कम घेऊन फिरता येत नाही अशी विविध कारणे सांगून निवडणुक आयोगाच्या भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी बबन आमले यांना धाक दाखवून तुमच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो अशी भीतीही दाखवली.
ही परिस्थिती पाहून फुले विक्रीते बबन आमले हे घाबरले व त्यांनी सविस्तर माहिती देत जवळ असलेल्या पैशांचा हिशेब देण्यासाठी तशी कागदपत्रे सादर कली मात्र या निवडणूक आयोगाच्या भरारी पथकातील उल्हासनगर महापालिकेत कार्यरत असलेले आण्णासाहेब बोरुडे, पोलीस कॉन्स्टेबल विश्वनाथ ठाकुर, राजरत्न बुकटे व इतर दोन सहकाऱ्यांनी गुन्हा दाखल करुन रक्कम जप्त करण्याची धमकी देत गुन्हा दाखल न करता सोडून देण्यासाठी ८५०००/०० हजार रुपयांची मागणी केली यावेळी नहाकच झंझट नको म्हणून बबन आमले यांनी रक्कम भरल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते.
परंतु बबन आमले यांच्या कष्टाने मिळवलेला पैसा असल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर तक्रार दाखल केली त्यानंतर पोलीसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन तसा अहवाल निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवला होता या अहवालाच्या आधारे उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी या प्रकरणातील पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले आहे.
हा घटनाक्रम पाहता “कुंपणानेच खाल्ले शेत” असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.