पाचोरा, भडगाव विधानसभा निवडणुकीत सहभागी शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, विजय पाटील यांची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/११/२०२४
पाचोरा, भडगाव विधानसभा निवडणुकीत काही उमेदवार वगळता काही उमेदवारांनी आचारसंहिता खुंटीला टांगून ठेवली आहे याचा प्रत्यक्ष अनुभव सर्वसामान्य व सुज्ञ नागरिकांना येत आहे. परंतु सत्तेपुढे व पैशापुढे शहाणपण चालत नाही याप्रमाणे सगळा काही अलबेला कारभार सुरु असल्याचे सगळीकडे दिसून येत असून संबंधित उमेदवाराच्या म्हणण्यानुसार निवडणूक अधिकारी आमचे काहीच वाकडे करुन घेऊ शकत नाही असे ठामपणे सांगत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
असाच गैरप्रकार पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघातील छत्रपती राजे स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रतापराव हरी पाटील यांच्या प्रचारार्थ रॅली मध्ये व घेण्यात आलेल्या जाहीर सभेत झाला असल्याची तक्रार भडगाव तालुक्यातील विजय दोधा पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली असून स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील यांनी पाचोरा येथे घेतलेल्या जाहीर सभेची चलचित्र फिती (व्हिडिओ चित्रीकरण) मिळावे अशी मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली असून ते पेनाची निब या निशाणी वर निवडणूक लढवत आहेत. यांच्या शैक्षणिक संस्था असून ते त्यांच्या प्रचारासाठी काढण्यात येणाऱ्या प्रचार फेऱ्या (रॅली), शक्ती प्रदर्शन मेळावे या ठिकाणी गर्दी जमवण्यासाठी तसेच इतर कामे करुन घेण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वापर करुन घेत जाणूनबुजून आचारसंहिता कायद्याचे उल्लंघन करीत आहेत व शासन नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी कोणत्याही प्रकारची दखल घेऊन कारवाई करत नसल्याची तक्रार विजय पाटील यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
तक्रारदाराच्या मते महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रतापराव हरी पाटील यांच्या शैक्षणिक संस्था असून या संस्थेतील शिक्षकवर्ग महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे रुमाल व टोपी घालून घालून प्रतापराव पाटील यांच्या प्रचारार्थ रॅली मध्ये तसेच शक्ती प्रदर्शन मेळाव्यात प्रचारासाठी फिरत आहेत. हा गैरप्रकार येथेच थांबत नसून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राजे संभाजी महाराज यांच्या उपस्थितीत दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रविवार रोजी घेण्यात आलेल्या मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी, सभामंडपात आलेल्या लोकांची व्यवस्था राखण्यासाठी तसेच सुत्रसंचलन करण्यासाठी सरासरी २०० ते ३०० शिक्षकांनी या मेळाव्यात सहभागी होऊन कायद्याचे उल्लंघन केले आहे.
त्याअनुषंगाने निवडणूक आयोग शासन निर्णय २०१० नुसार नियम १९०९ मधील ५, (१) तरतुदीनुसार नियम ५, (४) नुसार शिक्षकांना विधानसभा निवडणुकीतील रॅली मध्ये, मेळाव्यात तसेच प्रचारासाठी भाग घेण्यास निवडणूक आयोगाने कायदेशीर बंदी घातलेली असतांनाही महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील यांच्या प्रचारार्थ रॅली मध्ये व घेण्यात आलेल्या मेळाव्याला शिक्षकांनी गळ्यात रुमाल व डोक्यात टोपी घालून प्रचारासाठी भाग घेतला आहे. अशा शिक्षकांची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.