भारतीय लोकशाही आघाडी आयोजित दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक समूहाचा निर्धार मेळावा संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/११/२०२४
नुकतेच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवडणुकीत निर्णायक भूमिका घेण्यासाठी जळगाव येथे जिल्हास्तरीय भारतीय आघाडीची स्थापना केली असून त्या धर्तीवर भारतीय लोकशाही आघाडीचे मुख्य प्रवक्ते आयुष्यमान किशोर रमेश डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा येथे पाचोरा, भडगाव तालुकास्तरीय भारतीय लोकशाही आघाडी स्थापन करण्यात आली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडीचे ध्येयधोरणे पुढील ठरवण्यासाठी काल दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रविवार रोजी पाचोरा येथे गोपाल मंगल कार्यालय येथे दुपारी १२ वाजता दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी, अल्पसंख्याक, बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा मेळावा आयोजित करण्यामागचा हेतू म्हणजे दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी, अल्पसंख्याक बांधवांच्या अडीअडचणी व इतर समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत फक्त आणि फक्त आश्वासनांची खैरात वाटून मतदान मिळवून घेतले जाते मात्र तदनंतर कुणीही आमच्या समस्या सोडविण्यासाठी दिलेल्या शब्दांची वचनपूर्ती करत नाही ही बाब लक्षात घेऊन मतदारसंघातील पंचवीस २५ हजारांपेक्षा जास्त संख्येने असलेल्या आंबेडकरी विचारांच्या लोकांना एकत्र आणून स्थानिक प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून तालुकास्तरीय भरतीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून पाठींबा देण्यासंदर्भात सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचे ठरवण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
**************************************************
या निवडणुकीत एकगठ्ठा मतदानाची ताकद दाखवून देणार.
**************************************************
नेमीच येतो पावसाळा याप्रमाणे प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत आश्वासनांची खैरात वाटून आमचा मतदानापूरता वापर केला जातो नंतर दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी, अल्पसंख्याक, बांधवांच्या मेळाव्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते परंतु आता आम्ही आमच्या समस्या सोडविण्यासाठी जो उमेदवार कार्यतत्पर व वचनबद्ध असेल अशाच उमेदवाराला निवडून देऊ असे मत भारतीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आले.
कारण स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत दलित आदिवासी, मुस्लिम, भटके, विमुक्त, आदिवासी समाजाच्या जातीय निकषांचा डाव ठेवून वेळोवेळी जातीयवाद केला जातो हा जातीयवाद कायमस्वरुपी मिटवून जातीय सलोखा निर्माण करुन तो निभावणारा लोकप्रतिनिधी आम्हाला हवा आहे. पाचोरा, भडगाव तालुक्यातील प्रत्येक गावात श्री. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक तसेच तालुक्यात राज्यस्तरीय भव्य असे बुद्ध विहार, स्मारक, सभामंडप, समाजमंदिर उभारण्याची समाजाची मागणी असून हे उभारण्यासाठी शासकीय स्तरावर निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेणारा लोकप्रतिनिधी आम्हाला हवा असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
तालुक्यात बेरोजगारांची संख्या जास्त असल्याने उद्योग उभारण्यासाठी मागासवर्गीय विकासासाठी राखीव कोट्यातून पाचोरा तालुक्यात सुत गिरणी मंजूर केली तर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकेल, तसेच वंचित घटकांच्या मुलामुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना निवासी वसतिगृह, सर्व बांधवांसाठी भव्य असे वाचनालय, संविधान भवनाची निर्मिती, पाचोरा शहरात नवीन मंजूर झालेला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य अशा पुतळ्याची निर्मीती करुन त्या सभोवताली सुशोभीकरण व सर्व सुविधा, भव्य आसे संविधान भवन उभारण्यात आले पाहिजे या सर्व बाबींचा विचार करुन त्या पुर्णत्वास नेणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी आम्ही एकमताने ठामपणे उभे रहाणार आहोत.
*************************************************
संविधानाचा आदर ठेवून न्यायिक आरक्षण मिळावे.
*************************************************
संविधानाचा आदर ठेवून संविधानाच्या चौकटीत राहून गोरगरीब, मराठ, मुस्लिम अठरापगड जाती समाजाला आरक्षण मिळावे यासाठी झटणारे, कष्टकरी शेतकरी बांधवांच्या शेतीमालाला किमान हमीभाव मिळवून देणारा, तालुक्यातील वाढती गुंडागर्दी, अवैध धंदे, महिलांवरील होणारे अत्याचार थांबणारा लोकप्रतिनिधी आम्हाला हवा आहे. सोबतच पोटापाण्यासाठी महात्मा फुले विकास मंडळ, चर्मोद्योग महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, आदिवासी विकास महामंडळ, ओबीसी विकास महामंडळ अशा अनेक महामंडळाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देतांना वाढीव अटी, शर्तीचे निकष लावून निधी न देता यात छुपा जातीयवाद केला जातो असा आमचा आरोप असून याबाबत विधीमंडळात वारंवार आवाज उठवणारांना पाठिंबा दिला गेला पाहिजे.
गुंडागर्दी मुक्त मतदारसंघ हवा आहे.
पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत चालली असून या मुलांचा अवैध धंद्याकडे कल वाढला असल्याने या संधीचा फायदा घेऊन राजकीय वर्तुळात यांचा फायदा घेत या मजबूर युवकांना अवैध धंद्यात ढकलले जाते यातच ते पुढे व्यसनाधीन होऊन गुंडागर्दी करत आहेत. हा गैरप्रकार थांबवण्यासाठी एक चांगले प्रतिनिधीत्व करणारांची गरज आहे.
हा हेतू साध्य करण्यासाठी चांगले शिक्षण हवे आहे परंतु जिल्हापरिषद, नगरपालिकेच्या शाळा बंद करुन खाजगी शाळांना अनुदान, प्रोत्साहन दिले जात असल्याने गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेणे अशक्य झाले असून सरकारी शाळा पुर्ववत करुन शाळांचे खाजगीकरण थांबवले पाहिजे. सोबतच चांगल्याप्रकारे वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी आम्ही भारतीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून एकमताने उभे रहाणार असल्याचे ठरवण्यात आले आहे. तसेच आमच्या ध्येय, धोरणांकडे दुर्लक्ष केले तर आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे मत व्यक्त केले.
सदर मेळाव्याचे अध्यक्षस्थानी किशोर रमेश डोंगरे (मुख्य प्रवक्ता भारतीय लोकशाही आघाडी) हे उपस्थित होते तर भारतीय लोकशाही आघाडी समन्वयक समिती पाचोरा व भडगांव तालुका ज्ञानेश्वर सावळे, अलीम शेख रामजी जावरे, ऋषिकेश पाटील
चंद्रकांत सोनवणे, दशरथ तांबे, अरूण खरे ,विक्की ब्राम्हणे इनाम शेख.यांनी निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते.
भारतीय लोकशाही आघाडी कार्यालय संपर्क ९५०३१५२४७० / ९९७५०८२५९२