मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी महिलांची गुरढोरांसारखी वाहतूक, रोजंदारीचे पैसे न मिळाल्याने महिलांनी वाहिली शिव्यांची लाखोली.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/११/२०२४
सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुमधडाका सुरु असून या होणाऱ्या निवडणुकीसाठी कडक अशी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. असे असले तरी मात्र सर्वच पक्ष, अपक्षांनी या निवडणुकीत आपलेच उमेदवार निवडून येण्यासाठी सगळे फंडे वापरुन थोडक्यात सांगायचे झाले तर ‘कंबरेचे सोडून डोक्याला बांधुन’ प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत.
याकरिता सगळेच उमेदवार आपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी मोठमोठे मेळावे, संवाद सभा, प्रचार रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत मते मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु मेळावे, संवाद सभा व प्रचार रॅली मध्ये गर्दी जमवण्यासाठी महिला पुरुष, तरुण मुले, मुलीच नव्हे तर अल्पवयीन मुलामुलींना ३००/०० ते ५००/०० रुपये रोजंदारीवर आणून गर्दी जमवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.
परंतु आपल्या शक्ती प्रदर्शनासाठी, मेळावे, रॅली मध्ये गर्दी जमवण्यासाठी खेड्यापाड्यातील महिला, पुरुष, तरुण मुले, मुलींना मेळाव्याच्या ठिकाणी आणण्यासाठी मालवाहू व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातून आणले जाते व परत सोडून दिले जाते ही प्रवासी वाहतूक करतांना वाहन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहने पळवली जातात विशेष म्हणजे हा प्रकार एखाद्या दुचाकीवरुन तीन प्रवासी जात असले तरी कायद्यानुसार कारवाई करणाऱ्या कर्तव्यदक्ष कायद्याचे रक्षक असलेल्या पोलीस बांधवांच्या समोरच होत असल्याचे दिसून येत होते मात्र एक म्हण आहे “सत्तेपुढे शहाणपण चालत नाही” म्हणूनच की काय पोलीसांनी लहानपण घेतले असावे अशी शंका सहजपणे निर्माण होते.
***************************************************
रोजंदारीचे पैसे न मिळाल्याने महिलांनी वाहिली शिव्यांची लाखोली.
***************************************************
आजच्या मेळाव्यात वृत संकलन करत असतांनाच मंडपात बसलेल्या महीला भगिनींनी मध्ये चुळबुळ सुरु झाली काव माय सभा सुटी तव्हय पैसा भेटतीन का नही जेन्ही आपले रोज कबूल करीसनी आणेल शे तो भाऊ त कोठेच दिखी नही ऱ्हायणा अशी चर्चा सभा सुरु असतांना कानावर पडत होती. ऐकवळची सभा सुटली आलेली नेतेमंडळी, कार्यकर्ते मंडपातून निघून गेले सगळ काही शांत, शांत झाल परंतु मेळाव्यात गर्दी दाखवण्यासाठी आणलेले महीला, पुरुष, तरुण, तरुणी रस्त्यावर थांबून रोजंदारीचे पैसे केव्हा मिळतील या प्रतिक्षेत उभे होते.
तर काही ठिकाणी घोळक्यात ‘कुपण भेटन का नाही, कुपणना पैसा भेटनात की नही असा प्रश्न एकमेकांना विचारला जात असल्याचे दिसून येत होते. विशेष म्हणजे गोराडखेडा, वरखेडी, जारगाव, भडगाव रस्त्यावर दोन ते तीन दुचाकीस्वार झाडाच्या सावलीत थांबले होते व ते बिनधास्तपणे महीला, पुरुष, तरुण मुलांच्या हातात कुणाला ३००/०० तर कुणाला ४००/०० रुपये वाटप करतांना दिसून येत होते याच ठिकाणी कबुल केलेल्या रोजंदारी प्रमाणे पैसे मिळत नसल्याने व काहींना पैसेच मिळाले नसल्याने हाताचे काम सोडून आलेल्या हतबल झालेल्या महिलांनी जागेवरच शिव्यांची लाखोली वाहित होत्या.
हा सगळा प्रकार पाहून मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी महिलांची गुराढोरांसारखी वाहतूक, रोजंदारीचे पैसे न मिळाल्याने महिलांनी वाहिली शिव्यांची लाखोली असा प्रकार घडला असल्याचे खात्रीलायक वृत्त असून सत्यजित न्यूज प्रतिनिधींनी मेळाव्यात आलेल्या महिला, पुरुषांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला व या घटनेची सत्यता जाणून घेत अधिक माहितीसाठी चित्रफीत तयार केली आहे. परंतु या चित्रफित दिसणाऱ्या आमच्या मजबूर माता, भगिनींना व बंधुना समाजासमोर आणणे हे आम्हाला योग्य वाटले नाही म्हणून आम्ही तशी सृजनशीलता पाळली आहे असे आम्ही सत्यजित न्यूज कडून खुलासा केला आहे.