राज्य उत्पादन शुल्क तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग अर्थपूर्ण कुंभकर्ण झोपेत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/११/२०२४
जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अर्थपूर्ण कुंभकर्ण झोपेत असल्यामुळे हे दोघेही विभाग जळगाव जिल्ह्यात कार्यरत आहेत की नाही अशी शंका निर्माण झाली आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या बाबतीत बोलायचे झाले तर ऐन निवडणुकीच्या कालावधीत जळगाव शहरासह जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तसेच तालुक्यातील गाव, खेड्यापाड्यातील गल्लीबोळात व रहदारीच्या रस्त्यावर बिनबोभाटपणे गावठी हातभट्टीची दारु तयार करुन विक्री केली जात आहे. तसेच देशी विदेशी दारु विक्रीची अधिकृत परवानगी नसतांनाही पानटपरी, हॉटेल, उपहारगृह व इतर ठिकाणी अवैध दारु विक्री केली जात असून यात काही ठिकाणी नकली देशी दारु तसेच रासायनिक केमिकल वापरुन तयार करण्यात आलेली ताडी मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे.
तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर ऐन दिवाळीच्या सणानिमित्त संपूर्ण जळगाव जिल्ह्यात लहान, मोठ्या हॉटेल, उपहारगृह तसेच भररस्त्यावर शेव, चिवडा, लाडू, जिलेबी, पेढा, बर्फी व इतर तळलेले पदार्थ तसेच दुधापासून बनवलेल्या मिठाई बनवून विक्री केली गेली व आजही हा व्यवसाय तेजीत सुरु आहे. मात्र कमी खर्चात जास्त पैसा कमावण्याच्या नादात वरील खाद्यपदार्थ बनवतांना भेसळयुक्त बेसन पीठ, रवा, मैदा, गोडेतेल, मिरची पावडर, हळदी, मीठाचा वापर केला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या भेसळयुक्त पदार्थांमुळे खवय्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. तसेच महत्वाची बाब म्हणजे हे खाद्यपदार्थ विक्री करतांना भररस्त्यावर उघडे ठेवून विक्री केली जात असल्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या, येणाऱ्या वाहनांची धुळ, हवेतील धुळ, माशा तसेच रात्रीच्या वेळी प्रकाशाकडे आकर्षित होणारे पतंग व इतर पंख असलेले कीटक विद्युत दिव्याजवळ येतात व या खाद्यपदार्थांवर पडतात विशेष म्हणजे हे खाद्यपदार्थ तेलकट, तुपकट व गोड पदार्थ चिकट असल्याने हे उडत येणारे कीटक या खाद्यपदार्थांवर चिकटून पडतात व तेच खाद्यपदार्थ विक्री केले जात असल्याचे दिसून येत.
जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने दारुबंदी करण्यासाठी व नकली दारुची विक्री थांबवण्यासाठी स्वतंत्रपणे राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच जीवनावश्यक खाद्यपदार्थात भेसळ होऊन सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये म्हणून स्वतंत्रपणे अन्न व औषध प्रशासनची निर्मिती केली आहे. असं असेल तरी मात्र दोघ विभागातील बोटावर मोजण्याइतके अधिकारी व कर्मचारी सोडले तर सगळेच त्यांच्या जबाबदारीची जाणीव न बाळगता फक्त आणि फक्त पैसा कमावण्याच्या नादात संबंधित व्यवसायांना अभय देण्याच्या नावाखाली हातमिळवणी करुन दरमहा ठराविक रक्कम घेऊन कर्तव्यात कसूर करत असल्याचे दिसून येत यामुळे सगळीकडे अवैध व नकली देशी, विदेशी व गावठी दारुची विक्री तसेच भेसळयुक्त पदार्थ, तेल व विशेष करुन मिठाई बनवण्यासाठी नकली खवा, मावा वापरुन खवय्यांच्या आरोग्याशी खेळ खेळत आहेत.
उत्पादन शुल्क विभाग व अन्न व औषध प्रशासनाच्या या गैरकारभारामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून या गैरप्रकारात सामील असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करुन अर्थपूर्ण कुंभकर्ण झोपेचे सोंग घेतलेल्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.