निवडणुकीच्या धामधुमीत धार्मिक स्थळांवर धार्मिक नियमांची पायमल्ली.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/११/२०२४
सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून यात सर्वच राजकीय पक्षाचे तसेच काही अपक्ष उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून ही सुरवात करतांना प्रत्येक उमेदवाराने आपापली श्रध्दा असलेल्या धर्मस्थळावर जाऊन देवी, देवतांचे दर्शन घेऊन श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येत आहे.
याच प्रचारासाठी मंदिरात जाऊन श्रीफळ वाढवून देवी, देवतांचे आशिर्वाद घेण्यासाठी मंदिरात जातांना ढोलताशांच्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शक्ती प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात असतांना अति उत्साहाच्या भरात बरेचसे कार्यकर्ते जोडे, चपला, पादत्राणे मंदिराच्या ओट्याच्या किंवा गाराऱ्या बाहेर न काढता ती पायातच घालून वाजतगाजत, नाचत, कुदत थेट धार्मिक स्थळांच्या ओट्यावर चढत आहेत तर काही अतिउत्साही कार्यकर्ते पादत्राणे पायातच घालून थेट धार्मिक स्थळांच्या गाभाऱ्यात जात असल्याने तसेच बरेचसे कार्यकर्ते दारु पिऊन प्रचार रॅलीत सामील होतात व तेही थेट धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करत असल्याने धार्मिक स्थळांच्या सांस्कृतिक नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येत आहे.
हा गैरप्रकार थांबवण्यासाठी निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना योग्य त्या सुचना देणे गरजेचे आहे तसेच प्रचार रॅली मध्ये दारु पिऊन थेट धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवर घालावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.