दिवाळीच्या सुट्टीत सट्टा पेढ्या बंद असल्याने महिलावर्ग आनंदीत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/११/२०२४
**************************************************
(सट्टा खेळणाऱ्यांची कधी जीवाची मुंबई होऊ दिली नाही व कधी कल्याण होऊ दिले नाही असा सट्टा रुपी भस्मासुर आज आपल्या समाजाला आतून पोखरत आहे.)
**************************************************
महाराष्ट्रभरातून जिल्हा, तालुका, शहर, खेडेगावात गावागावात मुंबई, कल्याण नावाने सट्टा (जुगार) मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे दिसून येते. हा सट्टा म्हणजे (मटका) व्यवसाय भरवस्तीत, भरचौकात हमरस्त्यावर, शाळा, कॉलेज परिसरात तसेच धार्मिक स्थळांजवळ दिवसाढवळ्या दिवसरात्र बिनबोभाटपणे मोठमोठ्या पाट्या (फलक) लावून उघडपणे केला जात असल्याचे दिसून येत.
या सट्टा (मटका) नावाच्या जुगारात श्रम न करता आयता पैसा कमावण्यासाच्या नादात तरुण तुर्क, म्हातारे अर्क, अल्पवयीन मुले, शाळा, कॉलेजमध्ये जाणारा विद्यार्थीवर्ग तसेच विशेष म्हणजे काही प्रमाणात महिलावर्ग मोठ्या प्रमाणात गुरफटला गेला असल्याने या व्यवसायाला भरभराटी आली असून या अवैध सट्टा नावाच्या धंद्याकडे कायद्याच्या रक्षकांनी कुणाच्यातरी दबावाखाली म्हणा किंवा देवाणघेवाण करुन म्हणा कमालीचे दुर्लक्ष केले असल्याचा संशय सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केला आहे.
कारण या सट्टा नावाच्या भस्मासुराच्या नादी लागून आजपर्यंत बरीचशी कुटुंब बर्बाद झाली असून बरीचशी कुटुंब बर्बादीच्या मार्गावर आहेत. या सट्टा व्यवसायात बऱ्याचशा लोकांनी आपली स्थावर, जंगम, चल संपत्ति गमावली असल्याचे सांगितले जात असून बऱ्याचशा सट्टा खेळणारांनी आत्महत्या केल्याने बरीचशी कुटुंब आज रस्त्यावर आलेली दिसून येत आहेत.
परंतु आता दिवाळीच्या सुट्टीत येत्या सहा नोव्हेंबर २०२४ बुधवारपर्यंत सट्टा (मटका) किंगने आपला सट्ट्याचा व्यवसाय बंद केला असल्याने मोठमोठ्या शहरांसह खेड्यापाड्यातील, गल्लीबोळातील सट्टा पेढ्या बंद असल्याने सगळीकडे शुकशुकाट जाणवत असून सगळीकडे शांततामय वातावरण निर्माण झाले असल्याने महिलावर्ग कमालीचा खुषीत आहे. कारण सट्टा पेढ्या बंद असल्याकारणाने सट्ट्याच्या आहारी गेलेले घरधनी व घरातील जबाबदार व्यक्ती घराची पायरी सोडत नसल्याने व पैसा वाचत असल्याने घराघरात होणारे भांडणतंटे शांत झाले आहेत.
अशा परिस्थितीत महिलांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून शासनाने आम्हाला कोणत्याही योजना किंवा सोयीसुविधा देण्यापेक्षा मुंबई व कल्याण नावाने खेळवला जाणाऱ्या जुगाराच्या सुरु असलेल्या सट्टा पेढ्या कायमस्वरुपी बंद करुन तसेच गावागावातून विक्री होणारी गावठी व देशी दारुची खुलेआम विक्री बंद करुन आमचे संसार वाचवण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी महिला केली जात आहे.