भडगाव तालुक्यात इच्छुक उमेदवाराच्या प्रचाराची धुरा शिक्षकांच्या माथी, प्रचार फेरीत पक्षाचे झेंडे अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या हाती.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/१०/२०२४
पाचोरा, भडगाव विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे इतक्या आजी, माजी व नवख्या उमेदवारांनी उडी घेतली असून या निवडणुकीत सगळ्याच उमेदवारांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघात आपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरण्यास सुरुवात केली असून भडगाव तालुक्यातील एका उमेदवाराने आपल्या प्रचारासाठीची जबाबदारी शिक्षकांच्या माथी लादली असून या शिक्षकांनी आपल्या कामाची चुनक दाखवण्यासाठी उमेदवाराच्या प्रचार मेळाव्यात व गावागावांतील प्रचार फेरीमध्ये शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या हातात पक्षाचे झेंडे देऊन त्यांना उन्हातान्हात सकाळपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत फिरायला लाऊन ‘***** तुम आगे बढो हम तूम्हारे साथ है’ ‘***** यांनाच मते द्या’ ‘***** यांचा विजय असो’ अशा घोषणा देण्यासाठी भाग पाडत असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या शाळा अद्याप सुरु आहेत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला जात नाही. तसेच काही विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या आहेत तरीही त्यांना जबरदस्तीने बोलावून घेत प्रचार रॅली मध्ये घोषणाबाजी करण्यासाठी भाग पाडत आहेत. हा प्रकार एवढ्यावरच थांबत नसून शाळेत शिक्षकांकडून प्रत्येक विद्यार्थ्यांना तासंतास बसवून घेत घरी गेल्यावर तुमचे नातेवाईक, सगेसोयरे व शेजारच्या लोकांना सांगा की तुमचे मत ***** या चिन्हावर यांना द्या असा प्रचार करायला सांगितले जात आहे.
तसेच प्रत्येक शिक्षक व कर्मचारी यांनाही भ्रमणध्वनीवरून किंवा जमेल तसा प्रचार करण्याचा आदेश दिला असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या प्रचारासाठी अल्पवयीन मुलाचा वापर केला जात असल्याने सुज्ञ नागरिक व पालकवर्गाने कमालीची नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाने नेमुन दिलेल्या निवडनुक अधिकाऱ्यांनी या गैरप्रकारांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.