एका बाजूला लाडक्या बहिणींचा वेगळाच थाट दुसरीकडे मात्र बॅंकांमध्ये खडखडाट पैशाअभावी जीवनावश्यक कामे रखडली.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/१०/२०२४
लाडकी बहिण योजना सुरु झाल्यापासून पाचोरा शहरासह तालुक्यातील गाव, खेड्यापाड्यातील बॅंकेमध्ये तसेच बॅंकेच्या ग्राहक सेवा केंद्रावर महिलांची एकच गर्दी दिसून येत आहे. यामुळे सगळ्या बॅंकांमधुन तसेच ग्राहक सेवा केंद्रातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते आहे.
असे असले तरी मात्र आता लाडक्या बहिणींच्या नावावर आलेले पैसे काढण्यासाठी महिलांची एकच गर्दी असल्याने सगळ्या बॅंकांमध्ये इतक्या मोठ्या रकमेची वाटप करणे शक्य होत नसल्याची बाब समोर येत असून याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता बॅंकांमध्ये पैसाच शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहे.
यामुळे लाडक्या बहिणींचा विषय वगळता बॅंक ग्राहक असलेला व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग, नोकर वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांनी ऐनवेळी वापरण्यासाठी कामात येतील या हेतूने आपल्या संसारात काटकसर करुन बॅंकेमध्ये ठेवलेला पैसा वेळेवर परत मिळत नसल्याने आज हे बॅंक ग्राहक हैराण झाले आहेत. कारण बॅंकेतुन वेळेवर पैसे मिळत नसल्याने सगळेच अडचणी सापडले असून यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखाद्या बॅंक ग्राहकाला वैद्यकीय उपचारासाठी पैशाची गरज असतांनाही वेळेवर पैसे मिळत नाहीत कारण लाडक्या बहिणींची एकच गर्दी होत आहे तर कधी बॅंकेमध्ये पैसे शिल्लक नाहीत तर कधी सर्व्हर डाऊन असते यामुळे पैसे असूनही बॅंक ग्राहकांना उधार, उसनवार पैसे घेऊन वेळ निभावून घ्यावी लागत आहे.
यामुळे आजच्या परिस्थितीत एका बाजूला लाडक्या बहिणींचा वेगळाच थाट तर दुसरीकडे मात्र बॅंकांमध्ये खडखडाट अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने दिसून येते.