अमोल भाऊ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे पाचोरा, भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा दसरा गोड.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/१०/२०२४
आपला देश शेतीप्रधान देश म्हटल्या जात असला तरी शासनदरबारी शेतकऱ्यांना पाहिजे तसा न्याय मिळत नाही. असाचा काहीसा अनुभव २०२३ ते २०२४ मध्ये शेतकऱ्यांना आला होता मात्र आता भारतीय जनता पक्षाचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेवून राज्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्याकडे तगादा लावून शासनस्तरावर पाठपुरावा करुन पाचोरा, भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या शेती मालाची नुकसानभरपाई मिळवून दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सन २०२३ ते २०२४ या कालावधीत प्रत्येक शेतकऱ्याने दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे पिक विमा काढलेला होता. याच कालावधीत निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या कापूस, मका, उडीद, मूग सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तुर इत्यादी शेतीमालाचे खुप मोठे नुकसान झाले होते. असे असल्यावरही पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाईची रक्कम मंजूर झाल्यावरही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नव्हते म्हणून शेतकरी वर्ग अडचणीत सापडला होता.
ही परिस्थिती पाहून भारतीय जनता पक्षाचे विधानसभा प्रमुख अमोल शिंदे यांनी दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे संपर्क साधला असता शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नसल्याने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले असता अमोल शिंदे यांनी लगेचच मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्याकडे व शासनस्तरावर तगादा लावून ठेवत सतत पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले व आज प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
यात पाचोरा तालुक्यातील ४६ हजार ११६ शेतकऱ्यांना अंदाजे ९३ कोटी ५८ लाख रुपये व भडगाव तालुक्यातील २३ हजार ७७१ शेतकऱ्यांना अंदाजे ११ कोटी ८४ लाख रुपये असे एकूण १०५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करुन घेत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही नुकसान भरपाईची रक्कम ऐन दसऱ्याच्या म्हणजे सणासुदीच्या तोंडावर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा दसरा नक्कीच गोड होणार असल्याने पाचोरा, भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी अमोल शिंदे यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला नुकसानभरपाई मिळाली असल्याचे सांगत त्याचे कौतुक व आभार व्यक्त केले आहेत.