असा कसा हा पिक पाहणी ॲप, नुसता डोक्याला ताप.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०९/२०२४
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महसूल व कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पिक पेरा नोंदणीसाठी ई पिक पाहणी ॲप हे तब्बल तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. शासनाच्या ध्येय, धोरणानुसार ई पिक पाहणी ॲप हे सोयीचे वाटत असेल तरी मात्र हे ॲप शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून पिके पेरा लावतांना अनेक अडचणी येत असल्याने हे पिक पाहणी ॲप नसून नुसता डोक्याला ताप झाला आहे असे मत त्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शासनाच्या ध्येय, धोरणानुसार शेतकऱ्यांचा हितासाठी ई पिक पाहणी ॲप ही योजना अमलात आणली आहे. परंतु या ॲपच्या माध्यमातून पिक पेरा नोंदणी करतांना अनेक अडचणी येत असल्याने हे ॲप कुचकामी ठरत आहे. या ॲपव्दारे पिक पेरा लावतांना महत्वाची अडचण म्हणजे शेतकऱ्यांच्या शेत शिवारात मोबाईलचे नेटवर्क (रेंज) मिळत नाही तसेच सगळ्याच शेतकऱ्यांना या ॲपव्दारे माहिती कशी भरावी याचे पुरेपूर ज्ञान नसल्याने शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत म्हणजे १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत पिक पेरा नोंदणी करण्यासाठी कालावधी ठरवून दिला असला तरी आजपावेतो बऱ्याचशा शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पिक पेऱ्याची नोंद करता आली नसल्याने तलाठी व शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याने पिक पेरा नोंदणी करण्यासाठी मुदत वाढवून मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
महसूल विभागाच्या वतीने मागील तीन वर्षांपासून ई पिक पाहणी ॲप ही सुविधा राज्यभर राबविण्यात येत आहे. शासन व महसूल विभागाच्या या मोहिमेला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला मात्र जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पिक पेरा नोंदणीसाठी अनेक अडणींचा सामना करावा लागला व आजही करावा लागत आहे. पिक पेरा नोंदणीसाठी १५ सप्टेंबर २०२४ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती आता १५ सप्टेंबर ही तारीख निघून गेल्याने व तांत्रिक अडचणी तसेच काही शेतकऱ्यांना मोबाइलवरुन पिक पेरा नोंदणी करता आली नसल्याने अशा पिक पेरा नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित रहावे लागणार आहे.
यामागील कारण म्हणजे पिक पाहणी ॲप वरुन पिक पेरा नोंदणीसाठी शेतात जाऊन शेतातील पिकांचा फोटो अपलोड करावा लागतो हे करत असतांना त्याठिकाणी शेतमालक म्हणजे स्वता शेतकरी उपस्थित असणे आवश्यक आहे. तसेच बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे आजही अँड्रॉइड मोबाइल नाही व ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांना मोबाईल हाताळण्याचे व पिक पाहणी ॲपवर माहिती कशी भरावी याचे पूर्ण ज्ञान नसल्याने ते पिक पाहणी ॲप डाऊनलोड करुन भरुच शकत नाही. आणि विशेष म्हणजे ज्यांना संपूर्ण ज्ञान आहे ते पिक पेरा नोंदणीसाठी शेतात जाऊन प्रयत्न करतात मात्र मोबाईल क्रमांकावर संकेतस्थळ उपलब्ध होत नसल्याने दिवस, दिवसभर मोबाईलवर बोटे फिरवून, फिरवून बोटे दुखायला लागतात मात्र पिक पेरा नोंदणी करता येत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
म्हणून शासनाने पिक पेरा नोंदणीसाठी मुदत वाढवून द्यावी किंवा अन्य पर्याय उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.