मयत गोविंदाच्या कुटुंबियांना तात्काळ शासकीय मदत मिळावी, उबाठा सेनेची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०८/२०२४
सालाबादप्रमाणे यावर्षीही संपूर्ण भारतातून श्री. कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली व या निमित्ताने दुसऱ्या दिवशी सगळीकडे दहिहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. हा उत्सव साजरा करतांना पाचोरा शहरात एक दुर्दैवी घटना घडली व या घटनेत दहिहंडी फोडत असतांनाच एका गोविंदाचा खाली पडून अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या गोविदाला शासनाने दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा येथील बाहेरपूरा भागातील दहिहंडीचा उत्सव साजरा होत असतांना थर रचत असतांनाच पाचोरा येथील नितीन पांडुरंग चौधरी या गोविंदाचा खाली पडल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याने दहिहंडी महोत्सवात कोणत्याही गोविंदाचा अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये शासकीय मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले असल्याने मा. मुख्यमंत्री हे पाचोरा येणार असून या दौऱ्यादरम्यान दहिहंडी उत्सवात मयत झालेल्या स्व. नितीन पांडुरंग पाटील याच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी उपविभागीय अधिकारी पाचोरा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन देते वेळी दादाभाऊ चौधरी, माजी नगरसेवक संदीप जैन, युवा सेना उपजिल्हाप्रमुख मनोज चौधरी, गोविंदाच्या कुटुंबातील सदस्य मुकेश पांडुरंग चौधरी, सागर चौधरी, मनोज चौधरी, राहुल चौधरी, प्रवीण शिंपी, नितीन खेडकर यांच्यासह शिवसेना, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.