शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत केलेल्या गैरकृत्याचा वाद मिटला आपसात, परंतु शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा अंधारात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०८/२०२४
पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास मंडळ संचलित खाजगी प्राथमिक शाळेत एका शिक्षकाने दिनांक १६ ऑगस्ट २०२४ शुक्रवार रोजी शाळा सुटल्यानंतर इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यासोबत नको ते अश्लील चाळे केले होते. ही घटना घडल्यानंतर संबंधित मुलाने हा घडलेला प्रकार त्याच्या वडीलांना सांगितला असता पिडीत मुलाच्या वडिलांनी संस्थेचे मुख्याध्यापक व कर्मचारी काय लक्ष ठेवतात असा आरोप करत दिनांक १७ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी घडल्या प्रकाराबद्दल चौकशी करुन संबंधित संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती.
संबंधित पिडीत मुलाच्या वडिलांनी तक्रारी अर्ज दिल्यानंतर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापकांनी टंगळमंगळ करुन पिंपळगाव हरेश्वर गावातील काही प्रतिष्ठित लोकांना हाताशी धरून संबंधित पिडीत मुलीच्या वडिलांवर दडपण आणून त्यांना तक्रार मागे घेण्यासाठी भाग पाडले व संबंधित मुलांच्या वडिलांनी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापकांकडे मी माझी तक्रार मागे घेत असल्याचे लेखी निवेदन देऊन या झालेल्या गंभीर प्रकरणावर पडदा टाकला असल्याने पिंपळगाव हरेश्वर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
म्हणून सत्यजित नूजच्या माध्यमातून हा सगळा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज सायंकाळी पिंपळगाव हरेश्वर येथे जाऊन पिडीत मुलाच्या वडीलांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की दिनांक १६ ऑगस्ट २०२४ शुक्रवार रोजी तक्रारीत नमूद केलेल्या शिक्षकाने शाळा सुटल्यावर शाळेच्या खोलीची खिडकी बंद करुन एकांतात माझ्या मुलांसोबत अश्लील असे अशोभनीय गैरकृत्य केले होते. म्हणून मी १७ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी मुख्याध्यापकांकडे लेखी तक्रार केली होती. परंतु मी तक्रार दाखल केल्यानंतर काही दिवसांनी संबंधित शिक्षकाने माझी व माझ्या मुलाची माफी मागितली तसेच माझ्या मुली व मुले याच शाळेत शिक्षण घेत असल्याने मी तक्रार मागे घेतली असल्याचा खुलासा सत्यजित नूजकडे केला आहे.
असे असले तरी या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संबंधित शिक्षकाला कायमस्वरुपी निलंबित करण्यात यावे अशी मागणी पिंपळगाव हरेश्वर गावातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे. कारण या अगोदरही अशा घटना घडलेल्या असून आता नुकतेच दोन दिवसांपूर्वी याच शाळेतील एका वर्गात शिक्षण घेत असलेल्या काही चिमुकल्या मुलींचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला असल्याचे खात्रीलायक वृत्त असून शाळेत जाऊन व्हिडिओ काढणारा शाळाबाह्य तरुण हा विकृत स्वभावाच आहे म्हणून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
मात्र या झालेल्या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला शाळेत बोलावून घेत शिक्षा केली व त्याला सगळे व्हिडिओ डिलीट करायला सांगून झालेल्या गंभीर प्रकरणावर पडदा टाकला असला तरी या दोघ वेगवेगळ्या गंभीर घटना पाहाता शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने पिंपळगाव हरेश्वर गावातील नागरिकांनी तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच या संस्थेचे वेगवेगळ्या विषयांवर अनेक दावे न्यायालयात सुरु असून याच संस्थेने बोगस शिक्षक भरती केली असल्याने चौकशी सुरु असून एकप्रकारे या संस्थेमध्ये रस्सीखेच सुरु असल्याने संचालक मंडळाचे पाहिजे तेवढे लक्ष नसल्याने असे गैरप्रकार घडत आहेत म्हणून या संस्थेवर प्रशासक नेमण्याची मागणी पिंपळगाव हरेश्वर गावातून केली जात आहे.