कोंबड झाकल तरीही तांबड फुटलच, खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकाचा प्रताप, पालक वर्गातून संताप.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०८/२०२४
सद्यस्थितीत महाराष्ट्रात महिला व मुलींसाठी असुरक्षित वातावरण निर्माण झाले असून अपहरण, बलात्कार, विनयभंग, धमकी देऊन पळवून नेणे, वेगवेगळी अमिषे दाखवून महिला व मुलींची फसवणूक करणे या घटनांमध्ये दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. तसेच आता हे अशोभनीय प्रकार शिक्षणक्षेत्रात ही घडत असल्याने पालक वर्गातून भितीचे वातावरण तयार झाले असून आपल्या मुलींना शिकवायचे कि नाही या द्विधा मनस्थितीत पालकवर्ग तणावाखाली आला आहे.
तसेच बदलापूर येथील एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत सगळीकडे निषेध मोर्चा, निषेध आंदोलन, कॅंडल मार्च काढले जात असतांनाच दुसरीकडे नुकतेच कोल्हापुरात अवघ्या १० वर्षीय मुलीवर अत्याचार करुन निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. हा प्रकार येथेच थांबला नसून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास मंडळ संचलित खाजगी प्राथमिक विद्या मंदिरातील एका शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत अशोभनीय वर्तन केल्याची तक्रार विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास मंडळ संचलित खाजगी प्राथमिक विद्या मंदिरातील एका शिक्षकाने दिनांक १६ ऑगस्ट २०२४ शुक्रवार रोजी शाळा सुटल्यानंतर एका चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांसोबत वर्गाबाहेर न जाऊ देता थांबवून घेतले व सगळे विद्यार्थी निघून गेल्यावर शिक्षकाने शाळेची खिडकी बंद करुन बंद खोलीमध्ये विद्यार्थ्यांकडून गैरकृत्य करण्यास लावले हे गैरकृत्य करण्यास संबंधित विद्यार्थ्याने प्रतिकार केला मात्र संबंधित शिक्षकाने त्यापुढे जाऊन नको गैरकृत्य करण्यास सांगितले व करण्या भाग पाडले होते.
ही घटना घडल्यानंतर संबंधित विद्यार्थी घाबरत, घाबरत घरी आला व त्याने घडलेला सगळा प्रकार वडीलांना सांगितला मुलाने सांगितलेला प्रकार ऐकून घेतल्यावर विद्यार्थ्याच्या पालकांची तळपायाची आग मस्तकात गेली मात्र तरीही पालकांनी सामंजस्याची भुमिका घेत दुसऱ्या दिवशी दिनांक १७ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे लेखी स्वरुपात तक्रारी अर्ज देऊन संबंधित गैरकृत्य करवून घेणाऱ्या शिक्षकाची चौकशी करुन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
पिडीत विद्यार्थ्याच्या पालकाने तक्रार केल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलाच्या वडिलांना खोटी सहानुभूती दाखवत संबंधित शिक्षकाला आलेल्या तक्रारीबाबत दिनांक १७ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी एक थातुरमातुर लेखी नोटीस देऊन तीन दिवसांच्या आत खुलासा मागितला होता. परंतु आज २२ ऑगस्ट २०२४ गुरुवार उजाडला तरीही संबंधित शिक्षकाने नोटीसीची दाखल घेत आजपर्यंत कोणताही खुलासा दिलेला नाही तसेच विद्यार्थ्याकडून असे गैरकृत्य करवून घेणारा शिक्षक आजही उधळ माथ्याने शाळेत येऊन अध्यापनाचे काम करत असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे संबंधित पिडीत विद्यार्थ्याच्या पालकाने एक शाळेच्या मुख्याध्यापकांकडे व दुसरा पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला देण्यासाठी दोन तक्रारी अर्ज लिहिले अशी माहिती समोर येत असून संस्थेच्या संचालक मंडळातील काही सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकावर दबाव आणून पोलीस स्टेशनला देण्यासाठी लिहिलेला अर्ज ताब्यात घेऊन फाडुन टाकत आम्ही चौकशी समीती नेमुन सखोल चौकशी करतो असे आश्वासन देऊन झाल्या प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची जोरदार चर्चा पिंपळगाव हरेश्वर गावात ऐकावयास मिळते आहे.
परंतु हा घडलेला प्रकार व संस्थाचालक हा घडलेला प्रकार गांभीर्याने घेत नसल्याने भविष्य आम्ही आमच्या मुला, मुलींना या शाळेत कुणाच्या भरवशावर पाठवायचे असा प्रश्न उपस्थित करत या वेळी मुलांकडून गैरकृत्य करुन घेण्यात आले याची चौकशी करुन कारवाई न झाल्यास भविष्यात मुली सुरक्षीत राहतील की नाही अशी शंका येते असे मत सुज्ञ नागरिकांनी सत्यजित न्यूज कडे व्यक्त केले आहे.
**********************************************************
“कोबड झाकल तरीही तांबड फुटलच”
*************************************************************
खाजगी प्राथमिक शाळेत घडलेला गैरप्रकार दिनांक १६ ऑगस्ट शुक्रवार रोजी घडला असून पिडीत विद्यार्थ्याच्या पालकांनी दिनांक १७ ऑगस्ट शनिवार रोजी लेखी तक्रार केली असल्यावर ही या गैरप्रकाराची कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून ग्रामविकास मंडळ संचलित खाजगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व संचालकांनी पुरेपूर काळजी घेऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एकप्रकारे कोंबड झाकल तरी तांबड फुटल्याशिवाय रहात नाही ही म्हण खरी ठरली व तक्रारदाराने मुख्याध्यापकांकडे केलेल्या तक्रारीची तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित शिक्षकाला दिलेल्या नोटीसीची चर्चा ऐकायला मिळत आहे. म्हणून हा प्रकार चव्हाट्यावर आला असला तरी पिडीत विद्यार्थ्याच्या पालकावर दबाव आणून, अमिष दाखवून प्रकरण दडपण्याचा अतोनात प्रयत्न सुरु असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
*********************************************************
टीप ~ संबंधित शिक्षकाला कायमस्वरूपी निलंबित करण्यासाठी सत्यजित नूजच्या माध्यमातून न्यायालयात दावा दाखल करणार आहे.