मोराड येथील अवैध दारु विक्री करणाऱ्या महिलेचा कोल्हे गावात येऊन धिंगाणा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०८/२०२४
कोल्हे गावात चार घरातून देशी व गावठी दारुची अवैध विक्री केली जात होती. तसेच कोल्हे गावापासून जवळच असलेल्या पिंपळगाव हरेश्वर रेल्वे स्टेशनजवळील परिसरात मोराड येथील एक महिला अगोदर पत्र्याच्या टपरीत, नंतर भररस्त्यावर झोपडी उभारुन त्याठिकाणी गावठी हातभट्टीच्या दारुने भरलेला हंडा ठेवून बिनधास्तपणे गावठी हातभट्टीची दारु विक्री करत होती.
यामुळे कोल्हे गावातील तसेच मोरागड, पिंपरी, डांभूर्णी, वडगाव आंबे खुर्द, वडगाव आंबे बुद्रुक या गावातील अल्पवयीन मुले, तरुण वर्ग व म्हातारे अर्क याठिकाणी जाऊन दारु पिऊन धिंगाणा घालत होते. यामुळे वरील गावात व परिसरात अशांतता निर्माण झाली होती. व घराघरात भांडणतंटे होऊन महिलांना मारझोड करणे, व्यसन पूर्तीसाठी संसारोपयोगी वस्तू व धान्य विकून व्यसनपूर्ती करत होते. ही परिस्थिती पाहून कोल्हे येथील सुज्ञ नागरिक व महिलांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला भ्रमणध्वनीवर तक्रार दाखल केली होती.
याची दखल घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे यांनी काल दिनांक १२ ऑगस्ट २०२४ सोमवार रोजी एक पथक पाठवून पिंपळगाव हरेश्वर रेल्वे स्टेशनजवळ दारु विक्री करणाऱ्या महिलेच्या झोपडीत तसेच कोल्हे येथील तीन दारु विक्रेत्यांच्या घरावर धाडसत्र राबवून त्याठिकाणी आढळून आलेली गावठी हातभट्टीची दारु व इतर साहित्य ताब्यात घेऊन ते नष्ट करत कायदेशीर कारवाई केली व यापुढे दारु विक्री करु नये अशी तंबी दिली होती.
याचाच राग येऊन पिंपळगाव हरेश्वर रेल्वे स्टेशनजवळ राजरोसपणे दारुची विक्री करणाऱ्या मोराड येथील महिलेने आज दिनांक १३ ऑगस्ट २०२४ मंगळवार रोजी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्यादरम्यान थेट कोल्हे गावात येऊन कोल्हे गावातील ग्रामस्थ व महिलांना अश्लील शिवीगाळ करत माझी दारुची विक्री बंद करणारांना मी पाहून घेईन माझा हात धरला व माझ्याशी गैरवर्तन केले असा गुन्हा दाखल करुन जेलमध्ये रवानगी केल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी देत सुमारे अर्धातास बेछुटपणे अश्लील शिवीगाळ केली.
हा प्रकार पाहून कोल्हे गावातील पुरुष व महिलांनी सामंजस्याची भुमिका घेत त्या महिलेला परत जाण्याची विनंती केली मात्र संबंधित महिलेने काहीएक ऐकून न घेता अजूनच शिवीगाळ करत धमक्या देणे सुरुच ठेवल्याने सरतेशेवटी कोल्हे येथील महिलांनी कोल्हे गावात येऊन धिंगाणा घालणाऱ्या मोराड येथील महिलेची येथेच्छ धुलाई करुन तीला हाकलून लावले असल्याचे खात्रीलायक वृत्त असून मोराड येथील या दारु विक्रेत्या महिलेचा तसेच कोल्हे गावातील दारु विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन कायमस्वरूपी दारु विक्री बंद करावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.