श्रीमती अरुणा राठोड हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संशयीत गुलाब बाबाच्या मोबाईलची सखोल चौकशी करा, सुज्ञ नागरिकांची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०७/२०२४
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथून जवळच असलेल्या वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथील जय बालाजी काशी विश्वनाथ मंदिराच्या ओट्यावर दिनांक २९ जून २०२४ शनिवार रोजी जळगाव येथील रहिवासी व वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथील माहेरवाशीण श्रीमती अरुणा राठोड हि महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. या महिलेला बेशुद्ध अवस्थेत पुढील उपचारासाठी पाचोरा येथे नेत असतांनाच तीचे वाटेतच दुःखद निधन झाले होते.
श्रीमती अरुणा राठोड हिचा अकस्मात मृत्यू झाला व मृत्यू समयी तीच्या तोंडातून फेस येत असल्याने तीला कुणीतरी विषारी पदार्थ देऊन तीचा घातपात घडवून आणला असावा असा संशय आल्याने तीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला खबर देऊन मयत अरुणा राठोड हिचे शवविच्छेदन करुन घेतले आहे. परंतु अद्याप वैद्यकीय अहवाल आला नसल्याने अरुणा राठोड हिचा मृत्यू कशामुळे झाला हे सांगणे उचित ठरणार नाही. परंतु अरुणा राठोड हिचा मृत्यू झाल्यानंतर जय बालाजी काशी विश्वनाथ मंदिराचा पुजारी स्वताला परम पूज्य म्हणून घेणाऱ्या गुलाब चैतन्यजी महाराजाला मयत अरुणा राठोड हिच्या नातेवाईकांनी जबरदस्त मार ठोक केल्याची घटना घडल्यानंतर गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
विशेष म्हणजे अरुणा राठोड हिचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर संबंधित गुलाब महाराज यांचे वागणे, बोलणे व त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या एकाबाजूला तिसऱ्या दिवशी मयत अरुणा राठोड हिच्या अस्ती सावरण्याची तयारी सुरु असतांनाच दुसरीकडे संशयित गुलाब बाबाने वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथून पळ काढला यामुळे अरुणा राठोड हिच्या मृत्यूस गुलाब बाबाच कारणीभूत असल्याचा संशय बळावला असून मयत अरुणा राठोड हिचा व फरार असलेल्या संशयीत गुलाब बाबाला त्वरित ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल हस्तगत करुन मोबाईलची बारकाईने तपासणी करुन कॉल रेकॉर्ड काढण्यात यावे म्हणजे खरा प्रकार समोर येईल अशी मागणी सुज्ञ व जाणकार नागरिकांनी केली आहे.
महत्वाची बाब म्हणजे अरुणा राठोड हिचा मृत्यू झाल्यानंतर तीच्या माहेरचे नातेवाईकांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने व ते कोणत्याही प्रकारची माहिती देत नसल्याने पोलीस कारवाईस विलंब होत असल्याचे दिसून येते.