पाचोरा व जामनेर तालुक्यातील धर्मस्थळांवर बुवाबाजीला ऊत, भोळ्याभाबड्या जनतेच्या भावनांशी खेळ. अंधश्रद्धा निर्मूलन समित्या नावालाच.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०७/२०२४
पाचोरा व जामनेर तालुक्यातील वेगवेगळ्या धर्मस्थळांवर काही लोकांनी धार्मितेचा आधार घेत स्वताला स्वयंघोषित बाबा असल्याचे सांगत मला
रिद्धी, सिद्धी प्राप्त झाली आहे, मी अंतरयामी आहे, माझ्या अंगात साक्षात देवी, देवतांचा तसेच पिरबाबांचा निवास आहे अशी बतावणी करुन आठवड्यातून ठराविक दिवशी या वेगवेगळ्या धर्मस्थळांवर बोलावून मोठ्या प्रमाणात भाविक, भक्तांचा समुदाय जमल्यावर त्यांच्यासमोर ठराविक वेळात अंगात बाबांचे, देवी, देवतांचे व इतर साधुसंत व बाबाचे वारे आले म्हणजे साक्षात देव आमच्या शरीरात अवतरले आहेत असे भासवून जवळ बसवलेल्या मस्तकाच्या मदतीने त्यांच्याकडे आलेल्या पिडीतांना त्यांच्या समस्या विचारुन त्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडून मनमानी पैसे घेऊन गंडा, दोरा, तावित, करणी, कवटाळ करणे, एकांतात नेऊन अंघोळ घालणे तुमची समस्या बिकट आहे असे सांगून त्यांच्या मानसिकतेचे खच्चीकरण करत तुम्हाला आमच्या दरबारात काही महिने काही दिवस रहावे लागेल असे सांगून त्याना धर्मस्थळांवर थांबण्यासाठी भाग पाडून त्यांची आर्थिक लूट करत आहेत.
धार्मिकतेचा आधार घेऊन पाचोरा व जामनेर तालुक्यातील वेगवेगळ्या धर्मस्थळांवर वेगवेगळ्या ठिकाणी चाललेला हा बुवाबाजीचा गोरखधंदा दिवसेंदिवस वाढत चालला असून आजपर्यंत बऱ्याचशा ठिकाणी काही गैरप्रकार घडले आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास करणी, कवटाळ करण्यासाठी कोंबड्या, बकऱ्यांचा बळी देणे, महिला, पुरुषांना एकांतात नेऊन अंघोळ घालतांना महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, तुम्हाला कुणीतरी काहीतरी खाऊ घातले आहे, तुमच्यावर कुणीतरी काळी जादू केली आहे, तुम्हाला मुलबाळ होऊ नये म्हणून करणी, कवटाळ केले आहे, तुम्ही मंतरलेले पाणी ओलांडले आहे अशी अनेक कारणे सांगून दरबारात आलेल्या भाविकांचे मानसिक खच्चीकरण करत त्यावर तोडगा काढण्यासाठी आमच्याकडे उपाय आहे परंतु हे करुन घेण्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल असे सांगून भोळ्याभाबड्या भाबड्या भाविक, भक्तांची आर्थिक लूट करत आहेत.
विशेष म्हणजे हा सगळीकडेच अंधश्रद्धेचा बाजार राजरोसपणे सुरु असल्यावरही अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धा निर्मूलन कायदा राबवून या भोंदू बाबाचा कायमस्वरूपी बंदोबस्त का करत नाही हा प्रश्न निर्माण होतो. तसेच सुज्ञ नागरिक व समाजसुधारक सुध्दा या गंभीर विषयाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने बुवाबाजी उत आला असून समाजातील गोरगरीब, अंधश्रद्धाळू लोकांचे मानसिक, आर्थिक व सामाजिक खच्चीकरण केले जात आहे व याच अंधश्रद्धेच्या बाजारात आजपर्यंत काही ठिकाणी विनयभंग, मानसिक छळवणूक, आर्थिक लूट, शंका, कुशंका व यातूनच गावागावात व समाजातील वेगवेगळ्या जातीधर्मात तेढ निर्माण होत असल्याचे जाणवते तसेच मागील काही वर्षांपूर्वी नरबळी दिल्याच्याही घटना घडल्या आहेत परंतु समाजात नाहकच बदनामी व वैरभाव वाढेल म्हणून अशा घटनांना नजरेआड करण्यात आले आहे.
म्हणून भविष्यात अजून अशा काही वाईट घटना घडू नये म्हणून पाचोरा व जामनेर तालुक्यात सुरु असलेले अंधश्रद्धेचे दरबार (अड्डे) कायमस्वरूपी बंद केले पाहिजे अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून केली जात आहे.