दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संचालकांकडून, लोहारी ग्रामपंचायतीच्या नोटीसला केराची टोपली.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०६/२०२४
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या लोहारी येथील बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन पाचोरा संचलित दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संचालकांनी लोहारी येथील जिल्हापरिषद शाळेच्या शालेय शिक्षण समिती व सन २०१८ मध्ये ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेले सरपंच यांना विश्वासात घेऊन दिनांक १५ जून २०१८ पासून ते दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लोहारी येथील जिल्हापरिषदेच्या मराठी मुलांच्या शाळेच्या एकुण चार वर्गखोल्या दरमहा ५०००/०० (पाच हजार) रुपये प्रमाणे भाडेतत्त्वावर घेऊन त्या शाळा खोल्यांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग भरवले होते व आजही या जिल्हापरिषदेच्या शाळा खोल्यांवर दत्त माध्यमिक विद्यालयाने रितसर मान्यता न घेता ताबा करुन ठेवला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
तसेच विशेष म्हणजे बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनला लोहारी ग्रामपंचायत व शिक्षण समितीकडून दिनांक १५ जून २०१८ पासून फक्त अकरा महिन्यांच्या कालावधीसाठी या शाळा खोल्या भाड्याने देण्यात आल्या होत्या परंतु तदनंतर बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनच्या संचालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल असे सांगुन भावनिक आधार घेऊन या शाळा खोल्या ग्रामपंचायत सरपंच व शिक्षण समितीकडून मुदत वाढवून घेत दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत या जिल्हापरिषदेच्या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग भरवले होते.
शाळा खोल्या ताब्यात घेतल्यापासून बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनच्या संचालकांनी दरमहा ५०००/०० रुपये शाळा खोल्यांचे नियमितपणे भाडे देणे बंधनकारक होते. मात्र या विषयाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत ठरलेल्या करारानुसार दिनांक १५ जून २०१८ ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत एकुण झालेल्या भाड्याची रक्कम १३००००/०० (एक लाख तीस हजार रुपये) अद्यापपर्यंत दिलेले नाहीत म्हणून हे थकीत भाडे वसूल करण्यासाठी लोहारी ग्रामपंचायतीने बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनच्या संचालकांना वारंवार नोटीस बजावली आहे. मात्र संचालकांनी या नोटीसीकडे मुद्दामहून दुर्लक्ष करत मुदत संपल्यानंतरही भाडे न देताही ३० सप्टेंबर २०२० पासून सन २०२३ पर्यंत जिल्हापरिषदेच्या शाळेवर अनाधिकृतपणे ताबा कायम ठेवला आहे.
विशेष म्हणजे ३० सप्टेंबर २०२० मध्ये मुदत संपल्यानंतर भाडे आज ना उद्या मिळेल या भरवशावर सन २०२३ पर्यंत वाट पाहिली परंतु तरीही बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनच्या संचालकांनी आजपर्यंत भाडे दिलेले नाही म्हणून ०७ जुलै २०२३ शुक्रवार रोजी बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनच्या संचालकांना नोटीस बजावून तुमच्याकडे घेणे असलेली शाळा खोल्या भाड्याची रक्कम १३००००/०० (एक लाख तीस हजार) रुपये आजपर्यंतचे वाढीव भाडे देऊन शाळा खोल्या रिकाम्या करुन देत ताबा सोडावा याकरिता वारंवार लेखी सुचना देत वारंवार तोंडी सुचना दिली आहे.
तरीही आजपर्यंत बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनच्या संचालकांनी लोहारी ग्रामपंचायतीच्या नोटीसला केराची टोपली दाखवत शाळेवर ताबा कायम ठेवला असल्याने आता लोहारी गावचे सरपंच, सदस व ग्रामस्थ संतप्त झाले असून आजपर्यंत शाळा खोल्यांचे झालेले भाडे वसूलीसाठी व शाळा खोल्या ताब्यात घेण्यासाठी जिल्हापरिषद जळगाव यांच्याकडे रितसर तक्रार दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
_______________________________________________________________
*बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनचे संचालक*
बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनचे संचालक यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून खरा प्रकार काय आहे याबाबत खुलासा मागितला असता आम्हाला जिल्हापरिषदेच्या सक्षम अधिकाऱ्यांनी शाळा खोल्या व आमच्या ताब्यात असलेल्या शाळेच्या पटांगणाचे मोजमाप करुन स्क्वेअर फुटा प्रमणे भाडे आकारणी केली नसल्याने आम्ही भाडे दिले नाही असे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत.
______________________________________________________________
*लोहारी ग्रामपंचायतीचे सरपंच*
तर दुसरीकडे दरमहा पाच हजार रुपये प्रमाणे भाडे ठरलेले असतांनाही आजपर्यंत भाडे न भरता शाळेवर ताबा कायम ठेवला असल्याने भाडे वसूलीसाठी व शाळा खोल्या ताब्यात घेण्यासाठी तसेच बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनच्या संचालकांची मनमानी थांबवण्यासाठी आम्ही आता लवकरच वरिष्ठांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे लोहारीचे सरपंच यांनी सांगितले आहे.
_______________________________________________________________