मनमाड, येवल्यात शिक्षक मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या पैशांची पाकिटे जप्त, पोलीस व तहसीलदारांनी केली दोघांना अटक.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०६/२०२४
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीसाठी उद्या दिनांक २६ जून २०२४ बुधवार रोजी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर जिल्ह्यात या पाच जिल्ह्यात मतदान घेण्यात येणार आहे. परंतु या अगोदरच आज दिनांक २५ जून २०२४ मंगळवार रोजी पोलीस व तहसील विभाग यांना या निवडणुकीत पैसे वाटप होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
या गुप्त माहितीच्या आधारे महसूल विभागाचे अधिकारी कैलास गायकवाड, पोलीस निरीक्षक अशोक धुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या मनमाड तालुक्यातील गणेश नगर भागात एका बंगल्यावर छापा मारला असता त्या बंगल्यात दोन व्यक्ती संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्यावर त्या बंगल्यात जाऊन झाडाझडती घेतली असता त्याठिकाणी शिक्षण मतदारांना वाटप करण्यासाठी आणलेली ४५ पैशाची पाकिटे प्रत्येक पाकिटात पाच हजार रुपये व शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचा फोटो असलेले प्रचार पत्रक व साहित्य एका पिशवीत आढळून आले आहे. ही पाकिटे जप्त करत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या कारवाईची माहिती मिळताच नाशिक विभागीय मतदारसंघत गोंधळ उडाला आहे.
असाच काहीसा प्रकार येवला येथेही उघडकीस आला असून या ठिकाणाहून अशीच पाकिटे व प्रचार साहित्य जप्त करण्यात आले असून दोघ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मंडळ अधिकारी एस. एम. गुळवे यांनी दिली आहे.