जंगला तांडा येथे गावठी व देशी दारुचा महापूर. फर्दापूर पोलीसांचे अक्षम्य दुर्लक्ष.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०६/२०२४
सद्यस्थितीत सगळीकडे अवैध धंदे वाढले असून यात सट्टा, पत्ता, जुगार, अवैध गावठी व देशी दारुची विक्री करणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे खेड्यापाड्यात, गावात, वाड्यावस्त्यांवर हे सगळे अवैध धंदे रात्रंदिवस दिवसाढवळ्या सुरु असल्याकारणाने गावागावांतील अल्पवयीन मुलांसह तरुण तुर्क, म्हातारे अर्क या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे घराघरात दररोज भांडणतंटे होत असल्याने घराघरातील महिलावर्ग कमालीचा त्रस्त झाला असल्याचे दिसून येते.
असाच काहीसा प्रकार सोयगाव तालुक्यातील जंगला तांडा या संपूर्ण बंजारा वस्तीच्या गावात सुरु असून या गावात सट्टा, पत्ता, जुगार व मोठ्या प्रमाणात गावठी व देशी दारुची अवैध विक्री केली जात आहे. यामुळे संपूर्ण जंगला तांड्यावर अशांतता पसरली असून महिलावर्ग कमालीचा त्रस्त झाला असल्याचे दिसून येते. या तांड्यावर अवैध धंद्याचे बाबतीत कुणीही आवाज उठवला तर त्याला हे अवैध धंदे करणारे धमक्या देतात व सांगतात की आम्ही खालुन वरपर्यंत हप्ते देतो आमचे कुणीही काहीही करु शकत नाही. तसेच जंगला तांड्याचे सरपंच व पोलीस पाटील यांचे या अवैध धंद्यांकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.
ही बाब लक्षात घेता जंगला तांड्यावर अवैध धंदे करणाऱ्यांचे जंगलराज सुरु आहे की काय ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला असून जंगला तांड्यातील महिला व काही सुज्ञ नागरिकांनी फर्दापूर पोलीस स्टेशनला तक्रार करुनही या अवैध धंदे कराणारांवर कारवाई केली जात नसल्याने आता महिलावर्ग लवकरच वरिष्ठांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तरी फर्दापूर पोलीसांनी या अवैध धंदे करणारांवर कठोर कारवाई करुन सर्वप्रकारचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी केली जात आहे.