ग्रामपंचायत व महसूल विभागाच्या गलथान कारभारामुळे, पाचोरा तालुक्यात विटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराचा मृत्यू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०६/२०२४
(पाणी टंचाई लक्षात घेऊन मा. तहसीलदार साहेब पाचोरा यांनी विटभट्टी व्यवसायिकांना नोटीस बजावून विटभट्टी बंद करण्याच्या सुचना दिल्या होत्या अशी माहिती समोर येत असून जर मा. तहसीलदार साहेबांनी तशी नोटीस बजावली असल्यावरही त्या नोटीस कडे दुर्लक्ष केले नसते व ही विटभट्टी बंद राहीली असती तर आज एका गरीब कुटुंबातील होतकरु तरुणाचा जीव गेला नसता म्हणून या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून जोर धरत आहे.)
पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत व महसूल विभागाच्या गलथान कारभारामुळे पाचोरा तालुक्यातील गाळण येथे सुरु असलेल्या विट भट्टीवर काम करणाऱ्या एका नवतरुण मजूराचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून संबंधित वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यामागील कारण म्हणजे पाचोरा तालुक्यातील शेती शिवारात तसेच गावागावाती गावठाण किंवा गावरान जमीनीवर तसेच काही ठिकाणी वनविभागाच्या हद्दीत ताबा मिळवत त्याठिकाणी काही अधिकृत तर काही अनाधिकृत विट भट्ट्या मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. या विटभट्ट्या सुरु करतांना संबंधित व्यवसायिकांनी कायदा खुंटली टांगला असल्याचे दिसून येते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील गाळण बुद्रुक येथील नवतरुण सागर भिल हा एका विटभट्टीवर मजुरी करत होता.
परवा दिनांक ०४ जुन २०२४ मंगळवार रोजी या विटभट्टीवर विटभट्टीचा मालक व मजुरांनी पार्टीचे आयोजन केले अशी चर्चा गाळण बुद्रुक परिसरात ऐकावयास येत असून ही पार्टी म्हणजे (खाओ, पोओ, मजे करो) अशी रंगेल पार्टी होती. ही पार्टी सुरु असतांनाच पाऊस सुरु होऊन सगळे पावसात भिजले होते. याच गडबडीत सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सागर भिल याचा अचानक तोल जाऊन त्याचा इलेक्ट्रीक उपकरणाशी संपर्क झाल्यामुळे त्याचे अंग व कपडे ओले झाले असल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला होता असे सांगितले जात आहे.
सागर भिल याला विजेचा जोरदार धक्का बसताच त्याला काही कळायच्या आत तो जागेवर धाडकन जमिनीवर पडला तो जागेवर बेशुद्ध पडताच त्याच्या सहकारी मित्रांनी तातडीने त्याला उचलून पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सागर भिल याची तपासणी करुन मृत घोषित केले. तदनंतर काल संध्याकाळी पाच वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त असून याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी या घटनेत एका नव तरुणाला आपला जीव गमवावा लागला असून गरीब कुटुंबाचा आधार गेला आहे.
याबाबत अधिक बोलायचे झाल्यास पाचोरा तालुक्यातील गाळण येथील वीटभट्टीचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकाने विटभट्टीचा व्यवसाय सुरु करण्याआधी ज्या जागेवर विटभट्टी सुरु करायची आहे त्या जागेचे बिनशेती मध्ये म्हणजे (एन. ए.) ची नोंद केली आहे का ? तसेच विटभट्टीचा व्यवसाय करणारी व्यक्ती ही पारंपरिक विटभट्टी व्यवसाय करणाऱ्या समाजाची आहे का ? ज्या विटभट्टीवर सागर भिल याचा विद्युत करंट लागुन मृत्यू झाला त्या विटभट्टी व्यवसायीकाने संबंधित ग्रामपंचायतीकडून विटभट्टीचा व्यवसाय करण्यासाठी नाहरकत दाखला घेतला आहे का ? तसेच विटभट्टी व्यवसायीकाने महसूल विभागाची रितसर परवानगी घेतली आहे का ? घेतली असेल तर माती उचल म्हणजे गौण खनिज उचलण्याची परवानगी घेतली आहे का ? घेतली असेल तर आजपर्यंत किती ब्रास माती उचल केली आहे ? ज्या जागेवरुन माती उचलली आहे ती जागा कुणाच्या मालकीची आहे याची संमती व नोंद केली आहे का ? महत्वाची बाब म्हणजे विटभट्टी सुरु करण्याआधी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून रितसर परवानगी घेतली आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून या विटभट्टीवर अधिकृतपणे विद्युत जोडणी केली आहे का ? तसेच जर त्याठिकाणी कृत्रिम विज निर्मिती उपकरण उभारण्यात आले असेल तर ते शास्त्रशुद्ध पद्धतीने उभारण्यात आले आहे का ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. म्हणून अपघाताचा तपास करुन संबंधित विटभट्टीचा मालक दोषी आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
**महत्वाचे**
सद्यस्थितीत कमी श्रमात व कमी वेळात जास्त पैसा कमावण्याच्या नादात बरेचसे लोक पैशांच्या जोरावर विटभट्टीच्या व्यवसायात उतरले हे धनिक लोक गोरगरीब मजुरांकडून विटा बनवणे व भाजून घेण्याचे काम करुन घेतात. परंतु हे काम करुन घेतांना या पोटासाठी मजबूर असलेल्या मजुरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करत नाहीत. मजुरांना दिवसरात्र माती कामात राबवून घेतांना त्यांच्या तोंडाला मास्क असणे गरजेचे आहे. त्याठिकाणी पिण्यासाठी शुद्ध पाणी, प्रथमोपचार पेटी, डोळ्यात माती जाऊ नये म्हणून डोळ्याला चष्मा, उन, वारा, पावसापासून बचावासाठी योग्य ती सुविधा अशा कोणत्याही सुविधा उपलब्ध करुन न देता सगळे कायदे धाब्यावर बसवून ते राजरोसपणे विटभट्टीचा व्यवसाय करतांना दिसून येते आहेत.
वास्तविक पाहता ज्या गाव परिसरात विटभट्टीचा व्यवसाय सुरु करणार आहे तो त्या गावचा रहिवासी असावा. विट भट्टी ही गावापासून ठराविक अंतरावर लांब असणे गरजेचे आहे कारण विटा भाजतांना त्या विट भट्टीतून निघणाऱ्या उष्णतेमुळे व दुर्गंधीयुक्त वासाने ग्रामस्थांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. विटभट्टी साठी माती उचल कुठून करणार आहे त्या जागेची परवानगी व किती माती उचलली जाईल त्यानुसार गौण खनिज कर भरणे, पाणी वापर करतांना योग्य ठिकाणाहून पाणी उचल करणे, दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यास विट भट्ट्या बंद करणे गरजेचे असून माती व विटा वाहतूक करतांना रहदारीचा प्रश्न उद्भवणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असून विटा भाजण्यासाठी लाकडाचा उपयोग न करता कोळशाचा वापर करुन विटा भाजणे, विट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या आरोग्याची काळजी घेणे, अल्पवयीन मुले कामावर न ठेवणे असे बरेच कायदे व नियम आहेत.
परंतु विटभट्टी व्यवसायीक कोणत्याही परवानग्या घेत नाहीत या चालणाऱ्या विटभट्टी कडे स्थानिक ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, ज्या, त्या सजेचे तलाठी, सर्कल, तहसीलदार यांच्याकडून होणारे दुर्लक्ष करत असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होतांना दिसून येत आहे. यामुळे गोरगरीब मजूरांचे शोषण केले जात असल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. तसेच शासनाच्या गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याने हजारो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे सांगितले जात आहे.