कोल्हे धरणातून विद्युत चोरी सह पाणी चोरी, विद्युत वितरण कंपनी व पाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०५/२०२४
(कोल्हे धरणातून आजही जवळपास २५ विद्युत पंपाच्या साहाय्याने दिवसरात्र पाणी चोरी सुरु आहे.)
यावर्षी अत्यंत कमी प्रमाणात झालेला पाऊस व आता उन्हाळ्यात सगळीकडे कोरडे ठाक पडलेले नद्या, नाले, धरण, पाझर तलाव यामुळे गावागावाला होणाऱ्या पाणीपुरवठ्याची आजीची परिस्थिती पाहता अजून जवळपास एक महिना जलसाठ्यांचे जतन योग्य वापर करणे गरजेचे आहे. म्हणून धरण, पाझर तलाव व सार्वजनिक क्षेत्रातील पाणी साठा टिकून रहाण्यासाठी शेतीसाठी होणारी पाणी चोरी थांबवण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत. परंतु या आदेशाची कुठेही अंमलबजावणी होतांना दिसून येत नसल्याने काही गावांमध्ये लवकरच पाणी टंचाई निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता आजही पाचोरा तालुक्यातील धरणे, पाझर तलाव व इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जलसाठ्यातून दिवसरात्र पाणी चोरी सुरु आहे. या पाणीचोरीला विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी छुप्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण धरण, पाझर तलाव व इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जलसाठ्यातून पाणी उपसा करण्यासाठी विद्युत वाहिनीच्या तारांवर आकोडे टाकून दिवसाढवळ्या विद्युत चोरी सुरु असल्याने शेतकऱ्यांना पाणी चोरी करणे शक्य होत आहे. जर का विद्युत वितरण कंपनीकडून या विद्युत चोरट्यांवर कठोर कारवाई केली तर विद्युत चोरी सह पाणी चोरी थांबेल यात शंका नाही.
तसेच पाटबंधारे विभागाचे अधीकारी व कर्मचारी काही महिन्यांपासून त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या धरण, पाझर तलावाकडे फिरकलेच नाही अशी चर्चा जनमानसातून ऐकावयास मिळते आहे. तसेच कालच सत्यजित न्यूजच्या माध्यमातून “कोल्हे व घोडेगाव धरणातून विद्युत चोरी सह पाणी चोरी, दबाव येत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांची मजबुरी या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्धीस दिले होते. परंतु अद्यापही संबंधित अधिकाऱ्यांनी या वृत्ताची दखल घेतली नसून एका बाजूला मा. जिल्हाधिकारी, मा. प्रांताधिकारी व मा. तहसीलदार साहेब कोणत्याही गावात पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून रात्रंदिवस लक्ष ठेवून आहेत तर दुसरीकडे संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन कोल्हे धरणातून सुरु असलेल्या विद्युत चोरी व पाणी चोरी बाबत विचारले असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही व सतत दोन दिवस सुट्या असल्याने मंगळवारी बघू असे सांगितले यावरुन संबंधित अधिकारी किती कर्तव्यदक्ष आहेत हे लक्षात येते.
कोल्हे व घोडसगाव धरणातून विद्युत चोरी सह पाणी चोरी, दबाव येत असल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची मजबुरी. https://satyajeetnews.com/26978/