तारुखेडले गावाचे भूषण मा. श्री. प्रशांत गवळी एक आगळेवेगळे व्यक्तीमत्व.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०५/२०२४
आज निफाड तालुक्यातील तारुखेडले गावातील एक आगळेवेगळे व्यक्तीमत्व असलेले मा. श्री. प्रशांत गवळी यांचा आज वाढदिवस मा. श्री. प्रशांत गवळी यांचा जन्म ०८ मे १९८८ साली तारुखेडले गावी एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. प्रशांत गवळी यांचा जन्म जरी तारुखेडले गावी झाला असला तरी त्यांचे वडील नोकरीनिमित्त मुंबईला असल्याकारणाने प्रशांत गवळी यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण एम. कॉम पर्यंत मुंबईत झाले. तदनंतर त्यांनी जी. डी. सी. ॲंड एक. ची इंग्रजी माध्यमातून पदवी घेतली असून ते आज चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत.
असे असले तरी प्रशांत गवळी यांची जन्मभूमीची ओढ कायम आहे. कारण प्रशांत गवळी यांचा तारुखेडले गावी जन्म झाल्यानंतर ते जरी मुंबईत स्थायिक झाले असले तरी त्यांना त्यांच्या गावातील बालपणीच्या व शिक्षण घेत असताना सुट्या घालवण्यासाठी तारुखेडले गावी आल्यावरच्या आठवणी गप्प बसु देत नाहीत. कारण बालपणी गावी आल्यावर घराकडे जातांना रस्त्याने जातांना तु कसा आहेस अस आपुलकीने विचारणारे गावकरी, मित्रमंडळी व डोक्यावर मायेचा हात फिरवत गालगुच्चे घेऊन मुका घेणाऱ्या आजीबाई व मला पाहून उड्या मारत स्वागत करणारे माझे बालपणीचे सवंगडी व यांच्यासोबत रानोमाळी भटकंती करत असतांना स्वताच्या हाताने तोडून खाल्लेला ऊसाचा गोडवा, शेतमालकाच्या चोरुन दगड मारुन पाडलेला आंबा व आजीबाईच्या हातची हातावर बनवलेली व चुलीवर भाजलेली भाकरी व सोबत खलबत्त्यात कुटून बनवलेली लसणाच्या चटणीची चटक लागली असल्याने त्यांना गावाकडची ओढ, जिव्हाळा मग याची परतफेड करावी तसेच आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनात बाळगून प्रशांत गवळी यांनी नावासाठी साठी नव्हे तर गावासठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले आहेत.
प्रशांत गवळी तारुखेडले गावी आल्यावर त्यांना गवळी वस्तीतील आया बहिणींची पाण्यासाठी होणारी धावपळ, डोक्यावर हंडे घेऊन वस्ती पासून लांब, लांबच्या विहिरीवरुन पाणी भरण्यासाठी दिवसभर भटकणाऱ्या आया, बहिणींचे होणारे हाल पाहून प्रशांत गवळी यांनी शासनदरबारी पाठपुरावा करुन हातपंप बसवून गवळी वस्तीवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत कायमस्वरूपी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून जल, जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करुन घेत नुकतेच कामाला सुरुवात केली असल्याने गवळी वस्तीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला आहे. गावातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने रात्री बे रात्री जंगली श्वापदे, साप, विंचू व विशेष करुन डासांडा त्रास व्हायचा ही बाब लक्षात घेऊन त्यांनी सिंगल फेज रोहित्र मंजूर करुन घेत कायमस्वरूपी विद्युत पुरवठा मिळवून दिला.
प्रशांत गवळी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी गावातील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण केले. गावात जनजागृती करत लोकसहभागातून शाळा डिजिटल करण्यासाठी लोकसहभागातून जवळपास चार लाख रुपये जमा करुन जिल्हापरिषद शाळेसाठी ८८,३००/०० रुपये खर्चून ध्वनिक्षेपक, तीन कपाट, पाच चप्पल स्टांड, तीन टेबल, बारा खुर्च्या, विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार खाण्यासाठी स्टील प्लेट, अंगणवाडीच्या मुलांसाठी डबे, चमचे व सतरंज्या घेऊन दिल्या आहेत. देणगी जमा करुन शालेय साहित्याचे वाटप केले. गावाचे श्रध्दास्थान असलेल्या संतू आई मंदिर, शनी मंदिर, मुळ मुका आई मंदिर, महालक्ष्मी माता मंदिर, विठ्ठल बाबा मंदिर, म्हसोबा महाराज मंदिराला रंगरंगोटी करुन मंदिर परिसरात साफसफाई करत सुशोभीकरण करण्यात आले असून लवकरच मंदिर परिसरात तसेच शाळा, अंगणवाडी परिसरात वृक्षलागवड करण्यासाठी रोपे उपलब्ध करुन दिली आहेत.
कोरोणा सारख्या म्हहामारीच्या भीषण संकटात गावात औषध फवारणी करुन घरोघरी सॅनिटायझर व स्मास्कचे वाटप करत जनजागृती केली होती. जिल्हास्तरावर पाठपुरावा करुन गावातील नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला देत दिव्यांग बांधवांना ५% टक्के निधी उपलब्ध करुन दिला आहे. जल ही जीवन है पिण्यासाठी शुद्ध पाणी असेल तर आरोग्य चांगले राहते म्हणून आराखड्यात पाण्याच्या फिल्टरचा समावेश करुन घेत फिल्टर बसवून गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले. गरीब, आदिवासी लोकांना स्वखर्चाने धान्य वाटप केले. आभा व आधार कार्ड बनवून घेण्यासाठी गावकऱ्यांना भटकंती करावी लागत असे ही बाब लक्षात घेऊन प्रशांत गवळी यांनी कॅम्प लावून सगळ्यांना आभा व आधार कार्ड बनवून दिले. वेळोवेळी आरोग्य शिबीराचे आयोजन करुन मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.
तसेच गावातील मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी गावात रोपवाटिका सुरु केली. चोरीला गेलेल्या रोहित्राचा पाठपुरावा करुन नवीन रोहित्र बसवून घेतले. ग्रामपंचायतीचे कामकाज जलदगतीने होण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये पुर्णवेळ काम करण्यासाठी संगणक परिचालक नियुक्त केला. गावातील परिस्थिती संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी अधिकारी आपल्या भेटीला हा उपक्रम राबवून घेत यात महसूल, कृषी, आरोग्य, महीला व बालविकास तसेच ग्रामविकास अधिकारी यांना बोलावून घेत या अधिको ग्रामस्थांना योग्य मार्गदर्शन केले.
गावातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशांत गवळी हे दरवर्षी स्वखर्चाने शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करतात. गावात स्वखर्चाने मार्गदर्शक फलक लावले आहेत. ते मुंबई येथे रहात असल्याने तारुखेडले गावातील तसेच पंचक्रोशीतील लोकांना मुंबईसारख्या ठिकाणी दवाखान्यात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मोफत तसेच कमी खर्चात आरोग्यसेवा उपलब्ध करुन देतात. त्यांच्या या समाजाभिमुख कार्याची दखल घेत निफाड येथील माणूसकी फाउंडेशन तर्फे प्रशांत गवळी यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
असा हा ध्येयवेडा समाजसेवक मा. श्री. प्रशांत गवळी यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रशांत गवळी यांना दिर्घायुष्य लाभो व त्यांचा भविष्यकाळ सुख, समृद्धी व भरभराटीला जावो हीच सत्यजित न्यूज कडून ईश्वर चरणी प्रार्थना.