हातात नाही पैसा,कर देणार तरी कसा..? करमाफी करून,जनतेला द्या दिलासा- अमोल शिंदे
दिलीप जैन( पत्रकार ) पाचोरा-
कोरोना (कोविड-१९) च्या संसर्ग काळामध्ये उद्भवलेल्या भयावह परिस्थितीत संसर्ग टाळण्यासाठी दि.२२ मार्च पासून संपूर्ण पाचोरा शहर लॉकडाऊन करण्यात आले होते. येथील व्यापारी,उद्योजक, मजूर,दुकानदार व जनतेने लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोर पालन केले असल्याने कोरोना बाधितांची संख्या रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
मात्र या लॉकडाऊन चा फार मोठा विपरीत परिणाम सामान्यांच्या जीवनावर झालेला आहे.विशेषतः सुमारे ३ महिन्यांपासून व्यापार,उद्योग, व्यवसाय व दुकाने बंद असल्यामुळे समाजातील अर्थचक्र पूर्णपणे थांबले आहे. या परिस्थितीचा खूप मोठा फटका पाचोरा बाजापेठेला बसला असून शहरातील नोकरदार,व्यावसायिक,मजूर चाकरमाने व लहान मोठे विक्रेते,फेरीवाले प्रभावीत झाले आहेत.अर्थातच सर्व घटकांचे अर्थकारण मोडकळीस आलेले आहे.
या आर्थिक संवेदनशील काळात जनतेला दिलासा देण्यासाठी आपण पाचोरा नगरपरिषद कार्यक्षेत्रात विविध मालमत्ता कर,गाळे भाडे, विविध कर, उपकर व आकार माफ करून दिलासा द्यावा अशी मागणी नगरपालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदनाद्वारे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली या निवेदनातील विशेष बाब म्हणजे या निवेदनाला पाठींबा दर्शवण्यासाठी शहरातील व्यापारी,नोकरदार,मजूर या सर्व क्षेत्रातील जवळपास ५००० पेक्षा जास्त जनतेने स्वाक्षऱ्या करून पाठिंबा दर्शविला आहे.निवेदनातील सविस्तर मागण्या खालील प्रमाणे
१) शहरातील न.पा.मालकीच्या व्यापारी संकुलातील सर्व गाळेधारकांचे ६ महिन्यांचे भाडे व त्यावरील मालमत्ता कर माफ करण्यात यावा.
२) लॉकडाउन काळात प्रभावित झालेल्या पाचोरा न.पा. क्षेत्रातील सरसकट सर्व निवासी मालमत्ता धारकांची घरपट्टी,मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर कर ५०% माफ करण्यात यावे.
३) पाचोरा न.पा.क्षेत्रातील खाजगी व्यापारी संकुले अथवा खाजगी गाळेधारक व्यावसायिकांचा ६ महिन्याचा मालमत्ता कर माफ करण्यात यावा.
४) पाचोरा न.पा.आठवडे बाजार शुल्क, फेरीवाले,टपरीमालक यांच्या कडील दैनंदिन पावती स्वरूपात वसूल करण्यात येणारा कर (डेली कमिटी) व अन्य सर्व कर वर्षभरासाठी १००% माफ करावे.
५) पाचोरा न.पा.क्षेत्रातील सर्व व्यवसायिक मालमत्ता धारकांचे ६ महिन्यांचे मालमत्ता कर,पाणीपट्टी आकार व इतर कर,उपकर माफ करण्यात यावेत.
निवेदनातील वरील सर्व मागण्या तातडीने मंजूर करून जनतेला दिलासा द्यावा.अशी आग्रही मागणी अमोल शिंदे यांनी सर्व भाजपा नगरसेवक यांच्या समवेत केली.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील,कृ.उ. बा. समिती सभापती सतिष शिंदे,भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी,सरचिटणीस दिपक माने, राजेश संचेती,युवमोर्चा अध्यक्ष समाधान मुळे,आदी उपस्थित होते.