पिंपळगाव हरेश्वर येथील श्रीराम रथ उत्साहात भाविक, भक्तांचा हिरमोड.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०४/२०२३
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून येथे पुरातन श्रीराम मंदिर असून याच गावातील होऊन गेलेले महान संत श्री. गोविंद महाराजांनी वयाच्या दहाव्या वर्षी कायदा एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उत्राण, पहुर, पाळधी या गावांसह पिंपळगाव हरेश्वर येथे रथोत्सवाची सुरवात केली होती तेव्हापासून शेकडो वर्षे झाली तरी श्रीराम नवमीच्या दिवशी ही रथोत्सवाची परंपरा श्री. गोविंद महाराज मंदिर संस्थांतर्फे मा. श्री. शिवानंद महाराज व श्री. गोविंद महाराज संस्थांतर्फे आजतागायत सुरु आहे.
या रथोत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री. गोविंद मंदिर संस्थान व भाविक, भक्तांनी रथोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रीराम मंदिरात सकाळी ध्वजारोहण तदनंतर श्रीराम जन्म सोहळा, सायंकाळी दहिहंडी, भजन, कीर्तन करत गावभर श्रीराम प्रभुंची पालखी मिरवणूक काढून श्रीराम प्रभुंचा पाळणा सजवून जन्मोत्सव साजरा करतात यानिमित्ताने दहिहंडी व गोपाळकाल्याचा प्रसाद करुन जमलेल्या भाविकांना वाटण्यात आला.
दुसऱ्या दिवशी श्रीराम प्रभुंची रथयात्रा काढण्यात आली यावेळी मिरवणुकीत देव देवतांचे प्रतिरुप घेऊन वेगवेगळ्या वेशभूषेत सोंग काढली जातात हा आकर्षक देखावा पाहण्यासाठी पाचोरा, जामनेर तसेच मराठवाड्यातील सोयगाव तालुक्यातील व लांबलांबचे भाविक दर्शनासाठी येतात यावेळी रेवड्यांचा प्रसाद वाटण्यात आला. यावर्षीही दिनांक ०५ एप्रिल २०२३ बुधवार रोजी सालाबादप्रमाणे सायंकाळी पाच वाजता काढण्यात रथयात्रा काढण्यात आली यावेळी मा. श्री. रविंद्र महाराज यांच्या हस्ते सपत्नीक पुजा श्रीराम रथाची पुजा व आरती करुन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत वारकरी संप्रदाय, भजनी मंडळ, बालकांनी सादर केलेल्या विविध वेशभूषा तसेच श्री. सुर्य देवतेचे सोंग या मिरवणूकीचे आकर्षक ठरले.
श्रीराम प्रभुंची रथयात्रेची मिरवणूक सालाबादप्रमाणे पिंपळगाव हरेश्वर येथील कमानी दरवाज्यापासून सुरवात होऊन गुजर गल्ली, कुंभार गल्ली, देशमुख गल्ली, ग्रामपंचायत चौक बडगुजर गल्ली मार्गे काढण्यात येते यावर्षीही नियमितपणे रथयात्रा निघाली असतांनाच ही मिरवणूक ग्रामपंचायत कार्यालय तसेच या मंदिराचे पुजारी मा. श्री. शिवानंद महाराज यांच्या घरासमोर येताच तीस ते चाळीस तरुणांनी रथयात्रा थांबवून एकप्रकारे ठिय्या आंदोलन करत श्रीराम संस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने श्रीराम मंदिराचे पुजारी मा. श्री. शिवानंद महाराज यांची माफी मागावी तरच रथयात्रा पुढे नेण्यात येईल अशी भूमिका घेतली. हा घोळ तब्बल एक ते दीड तास चालला होता.
या अचानकपणे घडलेल्या प्रकारामुळे रथयात्रेत सामील झालेल्या हजारो भाविकांना एकप्रकारे मानसिक धक्का बसला रथ ओढत असलेल्या तरुणांनी एवढ्यावरच न थांबता जमीनीवर बसुन घोषणाबाजी करत आपली मागणी कायम ठेवल्याने श्रीराम संस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाला असे काही घडेल याची तिळमात्र कल्पना नसल्यामुळे तेही गोंधळून गेले.
एका बाजूला भाविक, भक्तांचा उत्साह पाहून रथयात्रेला गालबोट लागू नये म्हणून श्रीराम संस्थानचे अध्यक्ष मा. श्री. शामराव महाजन, उपाध्यक्ष मा. श्री. अजय पाठक व संचालक मंडळाने सामंजस्याची भुमिका घेत मंदिराचे पुजारी मा. श्री. शिवानंद महाराज यांची माफी मागितल्यानंतर वादावर पडदा पडला. तेव्हा भाविक, भक्तांनी सुटकेचा निःश्वास सोडला व रथयात्रा सुरळीतपणे सुरु होऊन रात्री दहा वाजता श्री. विठ्ठल मंदिरासमोर पोहचल्यावर तेथे रथाचे पुजन करत महाआरती करुन रथयात्रेची सांगता करण्यात आली.
ही मिरवणूकीच्या यशस्वीतेसाठी श्रीराम संस्थानचे अध्यक्ष मा. श्री. शामराव महाजन, उपाध्यक्ष मा. श्री. अजय पाठक, चिटणीस संजय सपकाळ, संचालक पंडित तेली, देविदास पाटील, निंबादास माळी, रविंद्र गिते, रमेश पाटील, सुनील चव्हाण, प्रदिप पवार, कोमलसिंग देशमुख, धनराज महाले, पुजारी मनोज साखरे, लिपिक भिवसन पाटील, संतोष पाटील सर्व संचालक मंडळ, सेवेकरी, पिंपळगाव हरेश्वर येथील सर्व समाजबांधवांचे अनमोल सहकार्य लाभले.
मागील बऱ्याचशा वर्षांपासून मा. श्री. शिवानंद महाराज या मंदिराचा कारभार पहात होते परंतु काही वर्षांपूर्वी या मंदिरासाठी श्रीराम मंडळ हे ट्रस्ट स्थापन करण्यात आले आहे. ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर मा. श्री. शिवानंद महाराज व ट्रस्ट मिळून मंदिराचा कारभार सुरु होता परंतु तदनंतर आर्थिक व्यवहार व काही कारणास्तव मा. श्री. शिवानंद महाराज यांनी मंदिराच्या कारणातून काढता पाय घेतला होता. यामुळे काही शिवानंद महाराज समर्थक नाराज होते व ही नाराजी या रथोत्सवानिमित्त बाहेर आली व रथयात्रेत गोंधळ झाल्याने भाविक भक्तांचा हिरमोड झाला होता अशी माहिती समोर येत आहे.