लोहारी गावाजवळील खड्डा बुजवण्यासाठी, पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या अपघाताच्या प्रतिक्षेत.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०३/२०२३

“रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे” असे फलक लावून जाहिरातबाजी करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पाचोरा व जामनेर तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली असून रस्त्यावर मोठ, मोठे खड्डे पडले असून खड्ड्यात रस्ते की रस्त्यावर खड्डे हेच कळत नसून काही ठिकाणी तर रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. बऱ्याचशा नदि, नाल्यांच्या पुलांची पडझड झाली असून पुलांचे कठडे ढासळून त्याठिकाणी मोठ, मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या गलथान कारभार तसेच लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात अनेक अपघात होऊन काहींनी आपला जीव गमावला असून काहींना दवाखान्यात उपचार करुन घेण्यासाठी लाखो रुपये खर्ची घातले तरी कायमच अपंगत्व आलं आहे.

रस्त्याची दयनीय अवस्था व दररोज होणारे अपघात लक्षात घेऊन काही सुज्ञ नागरिकांनी रस्त्यांचे नुतनीकरणासाठी वारंवार आवाज उठवला तर काही ठिकाणी आंदोलनेही करण्यात आली तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून बसले आहेत. यामुळे आता वाहनधारक व या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या वाटसरुच्या सहनशीलतेचा अंत झाला असल्याचे दिसून येत व लवकरच मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडण्याच्या प्रयत्नात आहेत.

पाचोरा ते अंबे वडगाव रस्त्यावर लोहारी येथील प्रसिद्ध गुरांचे व्यापारी मुक्तार शेट यांच्या घरासमोर मागील काही महिन्यांपासून एक भलामोठा खड्डा पडला असून या खड्ड्यांमुळे आजपर्यंत बऱ्याचशा दुचाकी इतर वाहनांचे अपघात होऊन वाहनांची मोडतोड झाली आहे तर काही दुचाकीस्वार जबर जखमी झाले आहेत. हा खड्डा त्वरित बुजवण्यात याकरिता काही सुज्ञ नागरिकांनी व समाजसेवकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पाचोरा यांच्याकडे संपर्क साधून खड्डा बुजवण्यासाठी विनंती केली मात्र आजपर्यंत हा खड्डा बुजवण्यात आला नसल्याने ” हा खड्डा बुजवण्यासाठी पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या अपघाताच्या (प्रतिक्षेत) तर नाही ना ? अशी शंका निर्माण झाली आहे.

तसेच अंबे वडगाव गावाजवळील लेंडी नाल्यावर ब्रिटिशकालीन पुल बांधण्यात आलेला आहे. या पुलाच्या कठड्यांची मागील काही वर्षांपूर्वी डागडुजी करण्यात आली होती. परंतु आता या पुलाच्या कठड्यांची पडझड झाली असून पुलाच्या दोघ बाजूला मोठ, मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे येथे मागे एक ट्रक पलटी होऊन मोठा अपघात झाला होता परंतु सुदैवाने जीवितहानी टळली होती. या पुलाच्या कठड्यांची दुरुस्ती व पडलेले खड्डे त्वरित न बुजवल्यास याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही. म्हणून लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे जातीने लक्ष देऊन ठेकेदारांकडून टक्केवारी घेऊन हजारो रुपये नव्हे तर लाखो रुपयांचा मलिदा खाऊन कुंभकर्ण झोप घेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवून त्यांना जागे करावे अशी मागणी केली जात आहे.