जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरळगाव हरेश्वर पत्रकार संघातर्फे पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनच्या पो. कॉ. योगीता चौधरी व सौ. सुनिता वाघमारे सन्मानित.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०३/२०२३
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर परिसर पत्रकार संघातर्फे महिला दिनानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रम राबविले जातात. यावर्षीही जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल योगिता ताई चौधरी व सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांच्या पत्नी सौ. सुनिता ताई वाघमारे यांचा सत्कार करुन सन्मानित करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल योगिता ताई चौधरी यांनी चांगल्याप्रकारे निमित्ताने त्यांचा व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांच्या पत्नी सौ. सुनिता ताई वाघमारे या पोलीस स्टेशनच्या परिसरात रहात असलेल्या जवळपासच्या गोरगरीब रहिवाशांच्या शाळेतील व शाळाबाह्य लहान, लहान मुलाबाळांचे शिक्षण चांगले व्हावे याकरिता दररोज मुलामुलींना शिकवण्यासाठी कोणताही मोबदला न घेता जवळपास ४५ ते पन्नास मुलामुलींचे मोफत शिकवणी वर्ग घेऊन त्यांना चांगल्याप्रकारे शिक्षण देत असतात. सौ. सुनिता ताई वाघमारे ह्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर या शिकवणी वर्गात येणाऱ्या लहान, लहान मुलामुलींच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांचे आईवडील सकाळपासूनच कामाला जात असतात अश्या मुलामुलींच्या हाताच्या नखा पासून तर शर्टचे बटन तुटलेले असेल किंवा थोडेफार कपडे फाटलेले असतील तर तुटलेले बटन लाऊन फाटलेले कपडे शिवून देतात. एवढेच नाही तर त्यांच्या आरोग्याची काळजीही घेतात.
या सामाजिक कार्याची दखल घेत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पिंपळगाव हरेश्वर पत्रकार संघातर्फे पोलीस कॉन्स्टेबल योगिता ताई चौधरी व सौ. सुनिता ताई वाघमारे यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
(“महिला आजही सुरक्षित नसल्याची पोलीस कॉन्स्टेबल योगिता ताई चौधरी यांची खंत”)
दरवर्षी ०८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो असे असले तरी आजही बऱ्याचशा महिला त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत. तसेच दररोजच्या घडणाऱ्या घटनांमध्ये महिला, मुलींवर होणारे अन्याय, कौटुंबिक व सामाजिक अत्याचार थांबता, थांबत नसून दररोज नको त्या प्रसंगाला महिलांना सामोरे जावे लागत आहे. मी पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावत असतांना दररोज चार ते पाच महिला रडत, रडत तक्रारी घेऊन येतात म्हणून आजही महिला सुरक्षित नाही असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. माझ्यामते जागतिक महिला दिनानिमित्त ने सगळीकडे महिलांचा सत्कार, सन्मान करण्यात येतो तो फक्त एक दिवसापूरता मर्यादित न राहता दररोज महिलांचा सत्कार व सन्मान झाला पाहिजे तरच जागतिक महिला दिन साजरा करण्याचे सार्थक होईल असे मत पोलीस कॉन्स्टेबल योगिता ताई चौधरी यांनी व्यक्त करत पिंपळगाव हरेश्वर पत्रकार संघातर्फे माझा सत्कार करुन सन्मानित करण्यात आले याबद्दल त्यांनी पत्रकार संघाचे आभार मानले.
(“आपणही समाजाचे काही देणे लागतो सौ. सुनिता ताई वाघमारे.)
मी सुखी घराण्यातील महिला आहे, माझ्या सगळ्या गरजा पूर्ण होतात, मला कुणाचीही गरज नाही. अशी धारणा ठेवून स्वतःसाठी जगण्यापेक्षा आम्ही ज्या समाजात जन्माला आहोत त्या समाजात प्रवाहात राहून आम्हाला आई, वडील, भाऊ, बहिण, पती, मुलगा, सुना, नातवंडे आहेत ही कौटुंबिक नाती सांभाळून या पलीकडेही आम्ही ज्या समाजात जन्माला आलो आहोत तो समाज म्हणजे सकल मानव समाज मग कोणत्याही जातीधर्माचा, गरीब, श्रीमंत असो अशा या समाजाचे आम्ही काही देणे लागतो. ही भावना मनात बाळगून समाजासाठी, समाजहितासाठी झटले पाहिजे. तसेच
माँसाहेब जिजाऊ, माहात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी मानसाला माणूस म्हणून जगता याव म्हणून केलेला संघर्ष व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत घरावर तुळशीपत्र ठेवून आपण समाजाचे काही देणे लागतो यासाठी अहोरात्र मेहनत करुन राज्य घटना लिहिली अश्या महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी घरात रिकामा वेळ न घालवता पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या आसपासच्या परिसरातील रहिवाशांच्या मुलामुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी पुढे आले सुरवातीला दोन ते चार मुले यायची आता माझ्याकडे ४५ ते ५० मुले, मुली न बोलावता येतात या मुलांना शिकवतांना मला खुप मानसिक समाधान मिळत कारण या मुलांना शिकवतांना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला समाधान मिळते. मी पद्मश्री, अनाथांची माय आदरणीय सिंधुताई सपकाळ यांचा जीवनपट वाचला आहे. त्यांनी कित्येक अनाथ मुलींचे मातृत्व स्वीकारुन त्यांना जणू पुनर्जन्म दिला आहे. मग आपण या पाच, पंचवीस मुलांना का शिकवण्यासाठी प्रयत्न करु नये असे मला वाटते असे मत सौ. सुनिता वाघमारे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे, उपनिरीक्षक मा. श्री. अमोल पवार व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंपळगाव पत्रकार संघाचे पत्रकार भिकन पाटील, रवी पांडे, सुनील लोहार, हेमशंकर तिवारी, संदीप सराफ, किशोर लोहार, दीपक मुलमुले, राकेश सुतार, चंद्रकांत माहोर, दीपक लाधे, इसा तडवी व विनोद काटे यांनी अथक परिश्रम घेतले.