दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०२/२०२३

पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव हे गाव महामार्ग क्रमांक १९ पाचोरा ते जामनेर रस्त्यावर बसलेले गाव असून या गावाजवळच मागील काही वर्षांपासून एक खाजगी मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे. व त्याच मोबाईल टॉवर साठी नव्याने विद्युत पुरवठा घेण्यासाठी नवीन विद्युत खांब उभारण्याचे काम एका खाजगी ठेकेदारांने सुरु केले असून हे विद्युत खांब उभारतांना पाचोरा ते जामनेर महामार्ग क्रमांक १९ च्या डांबरीकरणापासून फक्त आणि फक्त तीन ते चार फुट लांबीवर उभारले असल्याने या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची दाट शक्यता असल्याकारणाने ग्रामस्थांनी या विद्युत खांब उभारणीला विरोध केला असून लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग पाचोरा यांच्याकडे रितसर तक्रार दाखल करणार आहेत.

कारण की या पाचोरा, जामनेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते तसेच अंबे वडगाव हे ग्रामीण क्षेत्रात येत असल्याने या रस्त्यावर शेतकरी आपली पाळीव जनावरे व गाडी बैल घेऊन तसेच शेतात पायी जात असतांना वाहनांपासून बचाव करण्यासाठी डांबरीकणाच्या बाजूला म्हणजे साईड पट्टीचा वापर करतात व आता याच साईड पट्टीवर विद्युत खांब उभारल्याने ग्रामस्थांना रहदारीला अडथळा निर्माण होईल व अपघाताचे प्रमाण वाढेल अशी भीती निर्माण झाली असल्याने हे विद्युत खांब येथून त्वरित हटवण्यात यावे अशी मागणी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष ~

सद्यस्थितीत पाचोरा, जामनेर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी फक्त पगार लाटण्यासाठीच आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण पाचोरा ते जामनेर महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याबाबत वारंवार आवाज उठवल्यानंतर ही अद्याप पर्यंत नुतनीकरण करण्यात आले नाही. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे हद्दीतील मोठ, मोठे जुने महाकाय वृक्ष दररोज कापले व तोडले जात आहेत. तसेच पाचोरा ते अंबे वडगाव पर्यंतच्या अंतरात ठिकठिकाणी गतीरोधक बसवण्यात आले आहेत परंतु या ठिकाणी सुचना फलक नसल्याने वाहनांचे अपघात व मोडतोड होत आहे.

विशेष म्हणजे पाचोरा ते अंबे वडगाव दरम्यान पुढे गाव आहे, येथे शाळा आहे, पुढे गतीरोधक आहे, किंवा गतीरोकाजवळ सफेद पट्टे (झेब्रा क्रॉसिंग) काढण्यात आलेली नाही. वळण रस्ता आहे असे कोणतेही सुचना फलक लावण्यात आले नसल्याने वाहन चालकांची भंबेरी उडते व नको त्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. महत्वाचे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे हद्दीत रहदारीला अडथळा निर्माण होईल असे विद्युत खांब उभारले जात असतांनाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी डोळ्यावर पट्टी बांधून बसले असल्याचे दिसून येते आहे.

म्हणून आतातरी पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्तच्या मध्यापासून दोघ बाजूला दहा मीटर अंतराच्या आत उभारण्यात आलेले विद्युत खांब त्वरित काढावेत व अंबे वडगाव येथे नव्याने उभारण्यात येणारे विद्युत खांब काढण्यासाठी संबंधित ठेकेदाराला भाग पाडावे अशी मागणी केली जात आहे.

महत्वाचे ~
आजपर्यंत जळगाव जिल्ह्यात तसेच पाचोरा तालुक्यात बरेचसे अपघात रस्त्याच्या बाजूला अनाधिकृतपणे उभारण्यात आलेल्या विद्युत खांबावर दुचाकी व इतर वाहने आदळून झालेले आहेत. व बऱ्याचशा अपघातात वाटसरुंना आपला जीव गमवावा लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन आतातरी पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी जागे होतील व हे अतिक्रमीत विद्युत खांब रस्त्यावरुन काढतील अशी अपेक्षा आहे.

(पुढील भागात विद्युत वितरण कंपनीचा गलथान कारभार चव्हाट्यावर.)