दगडाला देवपण देणाऱ्या शिल्पकाराचे आयुष्य दुर्लक्षित.

सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~०८/०२/२०२३

देव ही संकल्पना आहे असे म्हटले जात असले तरी या चराचर सृष्टीचा निर्माता देव आहे असे काहींचे मत आहे तर ही सृष्टी निसर्गनिर्मित आहे असे म्हणणारा दुसरा गट आहे. असे असले तरी संकटात ऐनवेळी सगळ्यांच्या तोंडून देवा आता तूच असा शब्द आपसूकच तोंडातून बाहेर पडतो तसेच आजही आपण कोणत्याही कामाची सुरुवात देवाच्या नावाने व पूजनाने करतो किंवा मनुष्य कितीही विज्ञानाच्या गप्पा मारत असला तरी मानवनिर्मित बऱ्याचशा विज्ञानाने निर्माण केलेल्या उपकरणांचा वापर करण्याआधी त्यांची देवाचे नाव घेऊन मनोभावे पूजा करुनच शुभारंभ करतांना दिसतात.

तसेच हिंदू संस्कृतीत आराधना, उपवास, नवस, भजन, पूजन याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजही आपल्या देशात दिवसांची सुरवात सर्व समाजबांधव आपापल्या जाती, धर्मा प्रमाणे आपापल्या देवतांची पूजा करुनच करतात. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीत मुर्ती पूजा ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते. पुजा आली म्हणजे आपल्याला देव, देवतांच्या प्रतिमा किंवा मुर्तीची गरज भासते आपण मंदिरात जाऊन भक्तीभावाने पूजा करतो व आपल्याला फक्त आणि फक्त मंदिरातील देव दिसतो परंतु ज्या भगवंताने ही चराचर सृष्टी निर्माण केली त्याचे प्रतिक म्हणून मुर्ती बनवणाऱ्या पाथरवटाला आपण मात्र विसरतो ज्या पाथरवटाने मुर्ती बनवून आपल्यासाठी पुजा, आराधना करण्याची संधी उपलब्ध करुन देत एक रुपया दान पेटीत टाकून लाखो रुपयांची बरकत मागण्यासाठी व्यवस्था करुन दिली आहे तोच पाथरवट मात्र हलाखीचे जीवन जातांना दिसत आहे.

दगडाला टाकीचे घाव घालून देवपण मिळवून देण्यासाठीचा पारंपारिक व्यवसाय करणारा वडार समाज या व्यवसायात पिढीजात आपली कला जिवंत ठेऊन आपल्या सुप्त गुणांना वाव देत हा व्यवसाय करत आहेत. परंतु आता वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे कमी वेळात आकर्षक मुर्ती उपलब्ध होत असल्याने आता छिन्नी, हातोडा घेऊन दगडाला देवपण देणाऱ्या वडार समाजातील या शिल्पकारांना सद्यस्थितीत उपासमारीची वेळ आली आहे.

असेच एक वडार समाजातील रामदास जाधव हे कुटुंबासह पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड या गावी रहात असून हे आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जीवन जातांना दगडाला देवपण देऊन सर्व देवतांच्या मूर्ती व घरातील मृत्यू पावलेल्या पूर्वजांच्या हुबेहूब मूर्ती बनवून दगडात जीव ओतला परंतु यातून मिळणाऱ्या अल्पशा मोबदल्यात त्यांच्या फक्त दररोजच्या भाजी, भाकरीचा प्रश्न सुटत गेला मात्र मुलाबाळांना चांगले शिक्षण देऊन त्यांना घडवण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने ती मुलेबाळे ही पारंपरिक व्यवसायाला हातभार लावत आहेत.

आजकाल सगळीकडे वेगवेगळ्या उपकरणांचा वापर करुन आकर्षक अशा मुर्ती काही वेळातच उपलब्ध होत असल्याने या छिन्नी, हातोडा घेऊन घराबाहेर पडणाऱ्या रामदास जाधवला आता संसाराचा गाडा ओढण्यासाठी मुश्किल झाले आहे. विशेष म्हणजे हे कुटुंब मागील दोन पिढ्यांपासून कुऱ्हाड गावी रहात असून प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावत असल्यावर सुद्धा हे कुटुंब शासकीय जमिनीवर उघड्यावर आपल्या मुलाबाळांना घेऊन रहात आहे. आजपर्यंत या कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ मिळाला नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

रामदास जाधव ~

आम्ही मागील दोन पिढ्यांपासून कुऱ्हाड गावातील शासकीय जमिनीवर उघड्यावर राहून हा दगडाला देवपण देण्याच्या व्यवसाय करत आहोत. ज्याने या चराचर सृष्टीची निर्मिती केली त्याची मी निर्मिती करतो परंतु तरीही देव मला पावला नाही. म्हणून मी या पृथ्वीवर आहे की स्वर्गात या विचारात स्वप्नात देवाचा धावा करत असतांनाच कधीतरी पाच वर्षांतून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीवर माझ्याजवळ कुणीतरी येऊन माझ्या तोंडावर पाणी शिंपडून जागे करतो तेव्हा माझे स्वप्न पुन्हा जागे होते व माझ्यासमोर साक्षात परमेश्वर अवतरला की काय असा भास होतो कारण एखाद्याला साक्षात देव भेटायला यावा व त्याने म्हणाव की सांग वत्सा तुला काय पाहिजे अश्या आविर्भावात उमेदवार येतो मतदान मिळवून घेण्यासाठी आश्वासनांचा पाऊस पाडून आपल्या पदरात मतदान पाडून घेतो नंतर मात्र पाच वर्षे कधी निघून जातात हे कळत नाही मी पुन्हा आपल्या कामात व स्वप्नात रंगतो अश्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या