भाजपने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मोर्चा मुख्यमंत्री घरात तर शेतकरी मॄत्यूच्या दारात उभा आहे
![](https://satyajeetnews.com/wp-content/uploads/2024/03/featured-image-1.jpg)
दिलीप जैन.( पाचोरा )
दोन दिवसिवर दिवाळी सन येऊन ठेपला आहे सरकार निष्काळजीपणा करत आहे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला असतांना मुख्यमंत्री मात्र आज घरात बसून आहेत. त्यांना राज्यातील प्रश्नांशी काही घेणेदेणे नाही. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” हे फक्त उद्धव ठाकरे यांच्या घरापुरता मर्यादित आहे. राज्यात हाहाकार माजला. कोरोना आला. पूर आला. मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडले नाहीत. ते म्हणतात, कॉम्प्यूटर कशासाठी आहे ? या कॉम्प्युटरवर मला सर्व रिपोर्ट मिळतात. आता अशा मुख्यमंत्र्यांना काय म्हणायचे ? अशी घणाघाती टीका माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी जळगावात केली.
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात व शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सोमवारी ९ नोव्हेंबर रोजी भाजपतर्फे किसान मोर्चा काढण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच आकाशवाणी चौकात बैलगाडी, ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रस्तारोको आला. यावेळी माजी मंत्री आ.गिरीष महाजन, जिल्हा अध्यक्ष आ . सुरेश भोळे , खा. उन्मेष पाटील, खा. रक्षा खडसे, आ. संजय सावकारे, आ. मंगेश चव्हाण, आ. चंदुलाल पटेल, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, महापौर भारती सोनवणे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आ. स्मिता वाघ, सुरेश धनके, पोपट भोळे, मच्छिन्द्र पाटील, नंदकिशोर महाजन, ललिता श्याम पाटील आदी उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील केळी पिक विमा निकष बदलवून पूर्वी प्रमाणे मिळण्याबाबत व गेल्या दोन महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे झालेली शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्यातर्फे भव्य किसान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील यांनी त्यांच्या मनोगतात ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका करीत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिकारी, मंत्री विचित्र उत्तरे देतात असे म्हणत टीका केली.
यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, मागील मुख्यमंत्री आठवा, देवेंद्र फडणवीस यांनी हमीभावाने शेतकऱ्याला दर दिला. विविध पिके घेतली. शेतकऱ्याला न्याय दिला. ते ३६ जिल्हे फिरत आहेत, तुम्ही का नाही फिरू शकत असे म्हणत आताच्या सरकारने शेतकऱ्यांचे हरभरा, तूर काहीच घेतले नाही अन उद्धव ठाकरे म्हणतात शेतकऱ्यांना चिंतामुक्त करेन. अरे शेतकऱ्यांना ठार मारायचे काम हे सरकार करीत आहे अशा शब्दात टीका केली. पुढे ते म्हणाले की, विद्यार्थ्यांचे विद्यालयात प्रवेश होत नाही. नोकऱ्या मिळत नाही. मागच्या वर्षी केरळला पाऊस झाला. तेथे आम्ही औषधी आणि डॉक्टर घेऊन गेलो. कोल्हापूर, सांगली, सातारा येथे पूर आला त्या ठिकाणी आम्ही चक्क पाण्यात उतरून, जेथे घातक मगर होत्या तेथे उतरून आम्ही वैद्यकीय सेवा पुरविली. लोकांचे मदत कार्य केले आणि या ठिकाणी मुख्यमंत्री गुडघाभर पाण्यात सुद्धा उतरायला तयार नाहीत अशा मुख्यमंत्र्यांना म्हणायचं काय अशा शब्दात कठोर टीका केली.