आता तर अती झाले यापुढे सहन करणे शक्य नाही, क्षत्रिय गृप पाचोरा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/१२/२०२२

रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. असे मोठमोठे फलक लावून जनतेची दिशाभूल करणारा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर नक्कीच शब्दकोशाचा आधार घ्यावा लागेल व आम्ही खुपच त्रस्त झालो आहोत म्हणून आता जसे रस्त्यावरील खड्डे चुकवण्यासाठी जसा रस्ता सोडून वाहने चालवावी लागतात तसा रस्ता सोडून जर आम्ही बोलायला सुरुवात केली तर नक्कीच आमच्या संस्कृतीवर व संस्कारावर बोट ठेवून आमच्याबद्दल तोंडसुख घेतले जाईल यात शंका नाही. परंतु आम्ही या स्तरावर का ? गेलो कशासाठी गेलो ? आम्हा वाटसरुवर ही वेळ का आली ? याचा चांगल्याप्रकारे विचार केला तर नक्कीच सार्वजनिक बांधकाम विभागाची लक्तरे वेशीवर टांगल्या सारखी परिस्थिती निर्माण होईल यात शंका नाही.

कारण इतक्या मोजक्या शब्दात रस्त्यांच्या बाबतीत का लिहित आहे याबाबत विचार केला तर नक्कीच उशीराने का होईना आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच पाचोरा ते जळगाव रस्त्याचे रुंदीकरणासह सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यासाठीचे कामला सुरुवात झाली आहे. या रस्त्याचे काम सुरु होत असल्याचे बघून सगळीकडे सर्वस्तरातून कौतुक व शाबासकीची थाप पडली. या कामाची सुरुवात पाहून काही मोठ्या मनाच्या लोकांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष योगदान देण्याची तयारी दाखवली. परंतु मागील दिड वर्षांपासून या रस्त्याचे काम कासवगतीने सुरु होते व आतातर हे काम अर्धवट सोडून देण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर संबंधित कंपनीने आपल्या गाशा गुंडाळून पळ काढला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र या सर्व गोष्टींमुळे सर्वसामान्य जनतेला भोग भोगावे लागत आहेत. या अर्धवट झालेल्या रस्त्याच्या कामामुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याने या रस्त्यावरून जाता, येतांना वाहन धारकांना आपले वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर मौत का कुवा मध्ये जसे वाहन चालवतांना वाहन धारकाला जीव गहाण ठेवून चालावे लागते तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे आता वाहन धारक व प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून आता सगळ्यांचीच टाळकी फिरली म्हणण्यापेक्षा सटकली आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही परंतु अद्यापही कुणाचा संयम सुटला नाही हेच नशीब म्हणावे लागेल.

कारण खराब रस्त्यामुळे दररोज अपघातांची मालिका सुरु असून एखादा अपघात झाल्यानंतर मात्र त्या घटनेकडे फक्त आणि फक्त अपघात म्हणून पाहिले जात असले तरी या अपघातात कुणाचा जीव जातो, कुणाच्या स्वप्नांचा चुराडा होतो तर कुणाच्या घराचा आधारस्तंभ हिरावून घेतला जातो. यामुळे हा अपघात म्हणण्यापेक्षा अपघातग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबावर एक आघातच होतो व सगळ काही संपल्यासारख होत म्हणून की काय रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. असे मोठमोठे फलक रस्त्यावर लावलेले आढळून येतात परंतु या फलकावरील शब्दांचा अर्थ हा ते फलक लावणारांनाच कळाला नसावा म्हणून की काय आज सगळीकडे रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे दिसून येते.

या रस्त्याची झालेली दुरवस्था व या रस्त्यावर दररोज होणारे लहानमोठे अपघात निष्पाप गोरगरिबांच्या जीवाशी चाललेला खेळ अपघात झाल्यानंतर उध्वस्त होणारे जीव व त्यांचे कुटुंबीय ह्या सर्व घटना पाहूनही लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी झोपेचे सोंग घेऊन बसलेले असल्याने आता त्यांना जागे करण्यासाठी नव्हे तर वठणीवर आणण्यासाठी आता पाचोरा येथील क्षत्रिय गृप रस्त्यावर उतरणार असून पाचोरा ते जळगाव रस्त्याचे काम जलदगतीने व्हावे म्हणून आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.

म्हणून या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी क्षत्रिय गृपच्या वतीने दिनांक ११ डिसेंबर २०२२ रविवार रोजी दुपारी चार वाजता पाचोरा येथील हुतात्मा स्मारकात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सगळ्या संघटना, पक्ष, पत्रकार व मान्यवरांनी तसेच वाहन चालक, मालकांनी या बैठकीत उपस्थित राहून आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी व सहभागी होण्यासाठी उपस्थित राहून आपल्या भावना व विचार मांडावेत म्हणजे आपले आंदोलन यशस्वी कसे करता येईल याची दिशा ठरवण्यासाठी सोपे जाईल व आंदोलन यशस्वी होईल म्हणून जास्तीत, जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन क्षत्रिय गृप पाचोरा तर्फे करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या