पाचोऱ्यात रंगली संगीत सुरांची अनोखी आदरांजली.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०३/२०२२
पाचोरा येथील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव- शाखा पाचोरा, व रायझिंग सिंगिंग स्टार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा सप्ताह व पुस्तक भिस्सी ग्रुप वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील दिवंगतांना संगीत सुरांची अनोखी आदरांजली वाहण्यात आली. पाचोरा शहर व तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनींनी सादर केलेल्या या शब्द सुरांच्या आदरांजली ने रसिक तृप्त झाले.
यानिमित्ताने पाचोरा येथील श्री गो.से.हायस्कूलच्या प्रांगणात संगीत संध्येचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ५ मार्च संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत हा संगीतमय आदरांजलीचा कार्यक्रम संपन्न झाला.
श्री.गो.से. हायस्कूलच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाजसेवक खलीलदादा देशमुख अध्यक्षस्थानी होते. जळगाव जि. प.चे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तात्यासाहेब विकास पाटील यांच्या हस्ते संगीत संध्याचे उद्घाटन झाले. याप्रसंगी पी.टी.सी. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मा.श्री. दिलीपभाऊ वाघ, चेअरमन नानासाहेब मा.श्री. संजय वाघ, संचालक शशिकांत चंदिले, कृ.उ.बा. समितीचे पाचोराचे प्रशासक रणजीत पाटील, पाचोरा तालुका मराठा महासंघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे, पाचोरा येथील गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी तथा शापोआ अधीक्षक श्रीमती सरोज गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, भडगाव कॉलेजचे प्राचार्य श्री गायकवाड सर, पुस्तक भिशीचे जळगाव जिल्हा समन्वयक विजय लुल्हे, श्री.गो.से. हायस्कूल चे मुख्याध्यापक सुधीर पाटील, पर्यवेक्षक एन आर ठाकरे- पाटील सर, आर.एल. पाटील, केंद्रप्रमुख डी. ओ. शिरसाट पुस्तक भिशी च्या समन्वयिका अरुणा उदावंत, सारिका पाटील, राईझींग सिंगिंग स्टार चे समन्वयक राजेंद्र कोळी व राकेश सपकाळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
स्व. कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर, स्व. अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, स्व. गानकोकिळा लता मंगेशकर, स्व. गायक बप्पी लहरी, व रायझिंग स्टार चे संस्थापक स्व. विजय कुमावत यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला पाचोरा शहर व तालुक्यातील विशेषतः जिल्हा परिषद शाळेतील निवडक संगीत प्रेमी शिक्षक व शिक्षिका बंधू-भगिनींनी सूर व तालबद्ध गीत गायन केले. या कार्यक्रमात तब्बल २५ शिक्षक बंधू-भगिनींनी ५२ गीतांचे सादरीकरण केले. त्यात भक्तीगीत, प्रेरणागीत, स्वातंत्र्यगीत, महाराष्ट्रगीत , प्रेमगीत आदींच्या माध्यमातून नवरसांची मेजवानी दिली. सहभागी शिक्षकांनी व्यवसायिक गायकांच्या तोडीस तोड गायन कौशल्य उपस्थितांच्या समोर सिद्ध केले. विविध मराठी- हिंदी गाण्यांच्या सदाबहार मेजवानीने रसिक तृप्त झाले.
शिक्षणअधिकाऱ्यांनीही सुरात सूर मिसळला
शिक्षकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असलेले जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तात्यासाहेब विकास पाटील यांनीही आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले. श्री. विकास पाटील यांनी ‘कानडा राजा पंढरीचा’ या भक्तिपूर्ण गाण्याचे गायन करून ईश्वर भक्तिचा सूर आवळला. शिक्षणाधिकारी साहेब सहपरिवार उपस्थित असल्याने, त्यांनी रसिकांच्या आग्रहास्तव आपल्या पत्नीला शब्द सुरांची अनोखी भेट देताना ‘बहारो फुल बरसावो’ हे गीत सुद्धा त्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सादर केले.
या कार्यक्रमात श्री.दिपक हिरे, श्रीमती.प्राजक्ता जळतकर, श्रीमती.स्वाती महाजन, श्री.राजेंद्र कोळी, श्री.राजेंद्र बी.राठोड, श्री.राजेंद्र राठोड, श्रीमती. अल्का भोकरे, श्रीमती.वृषाली सोनार, श्रीमती.प्रतिभा बडगुजर श्री. राकेश सपकाळे, श्री.रावसाहेब पाटील, श्री.रवि पाटील साहेब श्री.ए.बी.अहिरे, श्री.सुरेश कदम, श्री.सागर पाटील, श्रीमती.सुवर्णा पाटील, श्री.अमरसिंग पाटील, श्री.दिलिप सोनवणे, श्री.आर.बी.तडवी, श्रीमती.रुपाली चौधरी, श्रीमती.दर्शना वसंत, आदित्य सोनवणे, श्री.विकास पाटील साहेब, युनुस बागवान हे कलाकार सहभागी झाले होते.
पुस्तक भिशीच्या समन्वयीका अरुणा उदावंत यांनी प्रास्ताविक केले. या अनोख्या कार्यक्रमाबाबत वाल्मीक अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष खलीलदादा देशमुख यांनी शिक्षकांमधील कलागुणांचे मुक्तकंठाने कौतुक करून सहभागी शिक्षक बंधू भगिनींना प्रेरणा दिली. सीमा पाटील, राजेंद्र राठोड, सारिका पाटील व वाल्मिक अहिरे यांनी सूत्रसंचालन केले, तर भाईदास सोमवंशी यांनी आभार मानले. पाचोरा येथील या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ एपीजे अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगावच्या पाचोरा येथील सदस्यांनी व रायझिंग सिंगिंग स्टार ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.