तलवारीला वैचारिकतेची धार देणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज! (मृत्यू कार विनोद अहिरे यांच्या लेखणीतून.)
दिनांक~१८/०२/२०२२
महाराष्ट्र ही संतांची भूमी, शेतकऱ्यांची भूमी, मराठीजनांची भूमी, शूर लढवय्यांची भूमी, मराठी जनतेच्या नसानसामध्ये शौर्य संचारल होते. परंतु ते शौर्य तो पराक्रम आपल्या मायभूमीचे रक्षणासाठी नव्हे, तर परकियांच्या चाकरीमध्ये राहून तो पराक्रम स्वतःला धन्य मानत होता. छोट्याशा जहागिरीच्या तुकड्यासाठी आपल्याच बांधवांचे रक्त सांडत होता. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलांच्या अत्याचाराने अन्यायाची परिसीमा गाठली होती. त्यामध्ये रयत अक्षरशः दबली होती, पिचली होती, सगळीकडे हाहाकार माजला होता.साक्षात मृत्यूनेही भयकंपित व्हावे, असा अत्याचार मराठी जनांवर होत होता.
रोज पहाटेच्या उगवणाऱ्या सूर्याकडे आशाळभूत नजरेने पाहून जनता आर्त हाक देत होती, की या सूर्य तेजाचा अंश या मातीत जन्म घेऊन आपल्या जीवनातील अंधकार नाहीसा करेल परंतु सुर्यास्ताबरोबर त्यांच्या अपेक्षाचांही अस्त होत होता.असे कित्येक वर्षे चाललं एक दिवस हा अत्याचार बघून काळही हेलावला. म्हणून त्या काळाने रयतेची आर्त हाक ऐकली आणि शिवनेरीवर एका प्रकाश शलाकेला डोहाळे लागले. त्या प्रकाशशलाकेचं नाव होतं जिजाऊसाहेब. शहाजी राजांची राणी, जिजाऊराणी. तुमची-आमची माता जिजाऊ माता.
जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले ते डोहाळे सामान्य नव्हते, तर…
शिवाच्या डमरूवर तांडव करावे, शिवाचे धनुष्य हाती घेऊन कडाकडा मोडावे,
यवनांच्या नरडीचा घोट घेऊन मराठी मातीचा रक्ताभिषेक करावा,
न्याय तराजूत शस्त्रांसह तुला करावी,
चक्रव्यूह भेदनाची रहस्य जाणावित,
शस्त्रसांभारासह मर्दानीचं रूप घ्यावं,
असे अलौकिक डोहाळे होते.ते ऐकून बायका चर्चा करीत एकमेकींना म्हणत असत जिजाऊ राणीचे डोहाळे विलक्षण तुमच्या आमच्यासारखे नाहीत.
एके दिवशी शिवनेरीवर संध्याकाळचा वारा अंगाला झोंबत होता, सूर्य मावळतीकडे झुकला होता, वातावरण अगदी शांत होते. शहाजीराजे आणि जिजाऊ राणी शांत संध्या समय अनुभवत होते. निवांत होते. जिजाऊ शहाजीराजांना म्हणाल्या या गडावरून आम्ही सूर्योदय पाहतो तेव्हा वाटतं सूर्याचा तो तांबडा भडक तेजोगोल जणू या शिवनेरीला सांगतोय, की तुझ्या अंगणात मी खेळायला येईल, बागडायला येईल आणि माझ्या तेजाचा एक अंश मी कायमचा तुझ्या मुलखात ठेऊन जाईल. ते माझ्या तेजाचे स्फुलिंग असेल, नवनिर्माणाचं, नवविचारांचं, न्यायाचं, पराक्रमाचं. शहाजीराजे विस्मयचकित होऊन जिजाऊ साहेबांना म्हणाले आम्हालाही तसंच जाणवते, की आपल्या पोटी सामान्यांचे हित झोपासणारा असामान्य पुत्र जन्म घेईल आणि शहाजीराजे मुलुखगिरीवर निघून गेले.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी संध्यासमयी जिजाऊ साहेबांना प्रसव वेदना जाणवू लागल्या आकाशातील सूर्य अस्ताला जात होता आणि शिवनेरीवर दुसरा सूर्य जन्माला येत होता.काही क्षणांनी सूर्य मावळला पुढच्या क्षणी तोफांचा गडगडाट झाला शिवनेरीवरचा आसमंत दुमदुमला वातावरणातील ताणलेपण एकदम शांत झालं आणि मुलगा झाला… मुलगा झाला… जिजाऊसाहेबांना मुलगा झाला. ही आनंदवार्ता गडभर पसरली. गडावर हत्तीवरून साखर वाटण्यात आली
शहाजीराजे चार महिन्यांनी शिवनेरीवर आले, दरम्यान बाळाचे नाव ठेवण्याचा सोहळा शिवनेरी गडावर साजरा झाला. ज्या गडावर जिजाऊंच्या पोटी बाळ जन्माला आले होते, ज्या गडावर जिजाऊ सुरक्षित होत्या, जो गड त्यांचे रक्षण करीत होता, त्या शिवनेरी गडाच्या नावावरूनच बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.
बाल शिवाजी सह्याद्रीच्या कुशीत, जिजाऊं साहेबांच्या शिस्तीत हळूहळू वाढू लागले. सह्याद्रीच्या कडेकपारीतून अलुतेदार, बलुतेदारांमधून त्यांनी मावळ्यांची फौज उभी केली. त्यांच्या फौजेमध्ये तानाजी मालुसरे, बाजी पालसकर, शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला यासह दौलतखान,सिद्दी हिलाल, दर्यासारंग, हसन खान यांच्यासह बहुजन समाजातील सरदारांची त्यांनी फळी उभी केली होती. त्यांच्या राज्यात जातीयतेला कधीच थारा नव्हता. ते नेहमीच म्हणत होते, की माणसाचे कौतुक त्यांच्या जातीवर नव्हे; तर मनगटाच्या सामर्थ्यावर व्हावे. महाराजांनी अनेक लढाया लढल्या पण त्यातील एकही लढाई जातीय द्वेषातून नाही, तर आपले राजकीय हक्क मिळविण्यासाठी,स्वातंत्र्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी लढल्या, त्यातूनच स्वराज्य उभं राहिलं. त्याची तलवार रणांगणावर तडपून शत्रूचा शिरच्छेद करत तर होतीच पण त्याचबरोबर त्यांच्या तलवारीला वैचारिकतेतची धार होती.
अशा या महान राजाच्या कर्तुत्वाला, विचारांना आम्ही मानाचा मुजरा करतो.
जय हिंद जय महाराष्ट्र
पोलीस नाईक,विनोद पितांबर अहिरे
पोलीस मुख्यालय जळगाव
९८२३१३६३९९
लेखक महाराष्ट्र पोलीस दलातील साहित्यिक/कवी आहेत.