धरण उशाला आणि कोरड घशाला, भोकरी ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती. ग्रामपंचायतीचा गलथान कारभार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी गावात ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप जनतेतून केला जात असून या गलथान कारभारामुळे आजच्या परिस्थितीत ग्रामस्थांना नळाचे पाणी बारा, बारा दिवसानंतर येत असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच भोकरी गाव अनेक समस्यांचे माहेर घर बनले आहे.
भोकरी गावासाठी तीन किलोमीटरवर असलेल्या मानमोडी येथील पाझर तलाव तसेच बिल्धी धरणावरून पाणी पुरवठा करण्यासाठी दोन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. असे असल्यावर सुद्धा भोकरीच्या ग्रामस्थांना नियमित किंवा दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणे क्रमप्राप्त असल्यावरसुद नळांना बारा, बारा दिवस पाणी पुरवठा केला जात नाही. म्हणून भोकरी ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
विशेष म्हणजे भोकरी गाव हे संपूर्ण मुस्लीम (कांकर) समाज बांधवांच्या वस्तीचे गाव आहे. यांची परिस्थिती पाहिजे तशी सधन नाही. त्यामुळे त्यांच्या घरात मोजकीच भांडीकुंडी असल्याने तसेच पाणी साठवणूक करण्यासाठी टाक्या घेणे शक्य नसल्याने पाणी साठा करणे शक्य होत नाही. त्यातच बारा दहा ते बारा दिवसातून पाणी येत असल्याने पिण्याचे पाणी साठवणूक न करता आल्याने दोघेही धरण तुडुंब भरलेली असतांना गाव व शेत शिवारातील विहिरींचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत असल्याने धरण उशाला आणी कोरड घशात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
विहीरींचे पाणी अशुद्ध असल्यामुळे भोकरी येथील रहिवाशांना संडास, उलटी व इतर आजारांचा सामना करावा लागत आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्यांना दवाखान्यात पैसे खर्च करावे लागत आहेत. तसेच विहिरीवरुन पाणी काढून आणतांना वयोवृद्ध व दिव्यांग व्यक्तींचे हाल होत असून पाणी काढतांना एखाद्यावेळेस विहिरीत तोल जाऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी दोन धरणावरून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित असून गावातही दोन पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभ्या आहेत. परंतु या टाक्या पैकी एक खूप वर्षापासून जुनी झाली असून ती केव्हा कोसळेल हे सांगता येत नाही. तर दुसरी टाकी दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आलु असून या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने, अद्यापही या टाकीचा उद्घाटन सोहळा झालेला नाही. पाण्याच्या टाक्यांनजवळ मोठ्या प्रमाणात डबके तुंबलेले असून या डबक्यात घाणीचे साम्राज्य असल्याने आसपासच्या शेजाऱ्यांना दुर्गंधी व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या जीर्ण झालेल्या टाक्या केव्हा कोसळतील याची शक्यता नाकारता येत नसल्याने या भितीमुळे आसपासचे ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत.
भोकरी गावासाठी दहा ते बारा दिवसानंतर पाणी येत असल्यावर सुद्धा गावात सार्वजनिक नळ नसल्यामुळे ज्या लोकांकडे स्वतंत्र नळ कनेक्शन आहे. त्यांच्या घरासमोर गरिब लोकांना रांगेत उभे राहून पाणी मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. भोकरी गावची लोकसंख्या ४७१० असून या गावासाठी जलजीवन योजनेअंतर्गत ४७२ लाभार्थ्यांना मोफत जलजीवन योजनेअंतर्गत नळ कनेक्शन देण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. यासाठी आठ लाख रुपये मिळाले असून पाईपलाईन साठी विस लाख रुपयांचा ठराव प्रस्तावीत आहे. एवढा खर्च करणे ग्रामपंचायतीला शक्य नसल्याने ही योजना राबवण्यासाठी अडचणी येत असल्याचे समजते.
भोकरी ग्रामपंचायतीवर १३ सदस्य असून एका बाजूला ९ विरुद्ध बाजूला ४ अशी सदस्य संख्या आहे. परंतु ज्यांची सत्ता आहे ते भोकरी ग्रामस्थांच्या अडीअडचणी कडे लक्ष न देता मनमानीपणे कारभार करत असल्याचा आरोप भोकरी ग्रामस्थांनी केला आहे. कारण मागील काळात आत्ताचे सत्ताधारी सरपंच व सदस्य सत्तेवर नसतांना भोकरी गावाच्या याच समस्या घेऊन तालुका व जिल्ह्यापर्यंत धडकले होते. तसेच प्रसारमाध्यमांकडे टाहो फोडला होता. व आता त्यांच्या हातात सत्ता आल्याने ते कोणतीही उपाययोजना करत नसून बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भोकरी ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून लवकरच आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
(ग्रामसेवक मा.श्री. गजानन नंन्नवरे साहेब.)
भोकरी ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक मा.श्री. गजानन नंन्नवरे यांची भेट घेतली असता लोड शेडिंग व वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे आम्ही मानमोडी धरणातून पाणी उचल करण्यात प्रयत्न करत असल्यावर सुद्धा विद्युत पुरवठ्याच्या अडचणी येत आहेत. म्हणून पूर्ण पाण्याची टाकी भरणे शक्य होत नाही. तसेच बिल्धी धरणावरुन दुसरी पाणीपुरवठा कार्यान्वित असून बिल्ली धरण ते भोकरी गाव यात खूप अंतराचा जास्तीचा टप्पा असल्याने तसेच या धरणावरून येणारी पाईपलाईन फुटली असून ती पाईप लाईन ज्या भागात भरपूर पाणी आहे त्याच भागात फुटल्याने त्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम शक्य होत नाही. तरीही आम्ही प्रयत्नशील आहोत व लवकरात लवकर पाईप लाईन दुरुस्ती करून भोकरी ग्रामस्थांना पुरेपूर पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे.
तसेच जलजीवन योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून शासनाकडून दिले जाणारे मोफत नळ कनेक्शन लवकरच देण्यात येईल, साफसफाई व ईतर समस्या सोडवण्यासाठी पण ग्रामपंचायत प्रयत्नशील असून पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन पाण्याची टाकी मिळवण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे. नियमितपणे पाणी पुरवठा सुरु करुन लवकर इतर समस्यां सोडण्यात येतील अशी माहिती ग्रामसेवक गजानन नंन्नवरे यांनी दिली आहे.